भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (१२ जुलै) झाला. केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करून एकट्याने सहा बळी मिळवले. या दरम्यान त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरा ‘फाइव्ह विकेट हॉल’ही मिळवला. असे असूनही जसप्रीत बुमराह आनंदी नसल्याचे समोर आले आहे. स्वत: बुमराहने याबाबत माहिती दिली.

त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत १९ धावा देऊन सहा बळी घेतले. इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. केवळ भारतीयच नाही तर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनीही बुमराहचे कौतुक केले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनने बुमराहला, सध्याच्या काळातील तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज म्हटले आहे. असे असूनही बुमराह त्याच्या कामगिरीवर फारसा खूश नाही.

हेही वाचा – Video : शोएब अख्तरचा विक्रम मोडण्यासाठी उमरान मलिक सज्ज? गुढ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

बुमराह म्हणाला, “आज चांगला खेळ केला त्यामुळे सर्वजण प्रशंसा करत आहेत. स्तुती ऐकून मी आनंदी होत आणि टीकेने निराशही होत नाही. एक गोलंदाज म्हणून मी मला शक्य त्या सर्व गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करतो. लोकांनी केलेली स्तुती किंवा टीका, मी फार गांभीर्याने घेत नाही. मी यश आणि अपयशाला माझ्या मनावर कधीच अधिराज्य गाजवू देत नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो. त्यामुळे मी स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो. एक गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्यास याची मला खूप मदत होते.”

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णाने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे इंग्लंडचा सर्व संघ ११० धावांमध्ये गुंडाळला गेला. त्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवनने केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारताला सहज विजय मिळाला.