IND vs ENG 1st T20I Called Off Due to Rain: सतत पडणाऱ्या पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिला टी२० सामना रद्द करण्यात आला. भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताने याही सामन्यात वैभव सूर्यवंशीला न खेळवण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसन (१) आणि इशान किशन (०) हे झटपट माघारी परतल्याने भारताची सुरुवात पुन्हा डळमळीत झाली. पण यानंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. २४ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावांची खेळी करून अभिषेक तंबूत परतला. यानंतर श्रेयसने सूत्रं हाती घेतली. तिलक वर्मा १३ धावा करून बाद झाला. शिवम दुबेने २१ चेंडूत ४२ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. श्रेयसने ४७ चेंडूत ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

भारतीय संघाने १८९ धावांची मजल मारली. इंग्लंडतर्फे साकीब महमूदने ३ विकेट्स घेतल्या. भारताचा डाव संपल्यानंतर पावसाचं आगमन झालं. पावसाचा जोर वाढत गेला. पंचांनी वारंवार मैदानाची पाहणी केली. ५ षटकांचा सामना होण्यासाठीही मैदान खेळण्यायोग्य नसल्याने अखेर पंचांनी सामना रद्द होत असल्याचं जाहीर केलं. पाच सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना मॅंचेस्टर इथे होणार आहे.

भारतीय संघाला आयर्लंड मालिकेत धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आयर्लंडच्या अनुनभवी संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या मालिकेत वैभव सूर्यवंशी पदार्पण करेल अशी शक्यता होती मात्र संघव्यवस्थापनाने टी२० वर्ल्डकपविजेत्या संघात बदल केला नाही. इंग्लंडविरुद्ध वैभव पदार्पण करणार अशी चर्चा होती मात्र पहिल्या सामन्यात तरी त्याला अंतिम अकरात स्थान देण्यात आलं नाही.