भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला असून भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज आहे. पाचव्या दिवसाचा खेळ बाकी असून भारताकडे विजयाची नोंद करत आघाडी घेण्याची संधी आहे. दरम्यान चौथ्या दिवसाचा खेळ सुरु असताना भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने आक्रमकपणा दाखवला असता विराट कोहलीने त्याला शांत केलं.

झालं असं की, ७४ व्या ओव्हरदरम्यान मोहम्मद सिराजने शेवटचा चेंडू टाकून इंग्लंडचा फलंदाज सॅम करनला डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी आक्रमकपणा दाखवणाऱ्या मोहमम्द सिराजवर विराट कोहली काहीसा संतापला आणि हातवारे करत शांत राहा असं सांगितलं.

IND vs ENG 1st TEST : चौथ्या दिवसअखेर केएल राहुल माघारी, भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज

भारत विजयापासून १५७ धावांनी दूर

जसप्रीत बुमराच्या (५/६४) भेदक गोलंदाजीला नेटाने सामोरं जात कर्णधार जो रुटने (१०९ धावा) साकारलेल्या शतकामुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात ३०३ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात २१० धावांचा पाठलाग करताना भारताने दिवसाअखेर उत्तम सुरुवात केली असून अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी १५७ धावांची गरज आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ५२ धावा केल्या असून रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२ धावांवर खेळत आहे. के एल राहुल २६ धावा करत माघारी परतला.