IND vs ENG 2nd ODI Match Timing Changed: भारताच्या इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर संघाने वनडे मालिकेची विजयाने सुरूवात केली आहे. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सहा गडी राखून दणदणीत पराभव करत, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता गुरुवारी कार्डिफ येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेण्याकडे भारतीय संघाचे लक्ष आहे. मात्र या दुसऱ्या सामन्याची वेळ मात्र बदलली आहे, सामना किती वाजता सुरू होणार, जाणून घेऊया.
पहिल्या वनडे सामन्यात शुबमन गिलने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने ८० धावांची उत्कृष्ट खेळी साकारली होती, पण खेळीदरम्यान त्याच्या उजव्या पायांमध्ये क्रॅम्प्स आल्याने त्याला रिटायर्ड होत मैदानाबाहेर जावं लागलं होतं. यानंतर अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदरच्या जोडीने शतकी भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला. तर या सामन्यात ४ विकेट्स व अर्धशतकी खेळी करणाऱ्या अक्षर पटेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
शुबमन गिल भारताच्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रझेंटेशनसाठी मैदानावर आला होता. दरम्यान त्याची दुखापत ठीक असल्याची माहितीही सूत्रांनी दिली होती. पण शुबमन गिल दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत सामन्याच्या वेळेस अधिकृत माहिती मिळेल. तर शुबमन गिल न खेळल्यास इशान किशनला संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात भारताचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली स्वस्तात बाद होत माघारी परतले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात या दोघांच्या पुनरागमनाची चाहत्यांना अपेक्षा असणार आहे.
भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता खेळवला जाणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कार्डिफमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता सुरू होईल. तर ५ वाजता सामन्याची नाणेफेक होईल. टीव्हीवर हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येईल. तर जिओ हॉटस्टार अॅपवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारताचा संघ
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, केएल राहुल कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव
