IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताने ३ बाद ९९ अशी मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर आटोपला. अक्षर पटेलने ६ तर रविचंद्रन अश्विनने ३ गडी माघारी धाडले. त्यानंतर उर्वरित दिवसाच्या खेळात भारतीय संघ फलंदाजीस आला. सलामीवीर शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पण रोहित शर्माने (५७*) दमदार अर्धशतक झळकावत अजिंक्य रहाणेच्या (१*) साथीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकला.

कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. सलामीवीर जॅक क्रॉली वगळता इतर एकाही फलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही. डॉम सिबली आणि जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद झाले. सलामीवीर जॅक क्रॉलीने शानदार अर्धशतक केलं. कर्णधार जो रूट (१७) स्वस्तात बाद झाला. जॅक क्रॉली अर्धशतक (५३) ठोकून माघारी परतला. पाठोपाठ बेन स्टोक्स (६), ओली पोप (१), जोफ्रा आर्चर (११), जॅक लीच (३) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३) सारेच स्वस्तात बाद झाले.

Ind vs Eng: इशांत शर्माचा मैदानात पाऊल ठेवताच पराक्रम; राष्ट्रपतींनी केला सत्कार

इंग्लंडचा डाव ११२ धावांवर आटोपल्यावर भारतीय सलामीवीरांनी अत्यंत संथ सुरूवात केली. पण अखेर ५१ चेंडूत ११ धावा केल्यावर शुबमन गिल बाद झाला. पाठोपाठ चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. विराटच्या साथीने डाव सावरत रोहित शर्माने ६१ चेंडूत अर्धशतक ठोकलं. पण अखेर विराट बचावात्मक फटका खेळताना २७ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या साथीने रोहितने दिवस संपेपर्यंत डाव सांभाळला.

संघात बदल

इंग्लंडने संघात चार बदल केले. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि जॅक क्रॉली या चौघांना संघात स्थान देण्यात आले. तर जो बर्न्स, लॉरेन्स, स्टोन आणि मोईन अली यांना संघातून वगळण्यात आले. भारतानेही संघात दोन बदल केले. सिराजच्या जागी बुमराहला संघात स्थान मिळाले. तसेच कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदर संघात आला.