भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने झाले असून १-१ ने बरोबरी आहे. तर एक सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथा कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न आहे. चौथा कसोटी सामना लंडनच्या केनिंगटन ओवल मैदानावर उद्यापासून खेळला जाणार आहे. भारताने या मैदानावर पहिला कसोटी सामना १९३६ साली खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारताने या मैदानात १३ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी फक्त एका सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे आणि ७ कसोटी सामने अनिर्णित ठरले आहेत.

भारतीय संघाने या मैदानात शेवटचा विजय ऑगस्ट १९७१ मध्ये मिळवला होता. या सामन्याचं नेतृत्त्व अजीत वाडेकर यांच्या हाती होतं. १९७१ मध्ये १९ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान हा सामना खेळला गेला. हा सामना भारताने ४ गडी राखून जिंकला होता. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३५५ धावा केल्या होत्या. तर भारतीय संघ पहिल्या डावात २८४ धावा करू शकला. मात्र दुसऱ्या डावात भारतीय गोंलदांजांनी कमाल केली. भागवत चंद्रशेखरच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा फलंदाज तग धरू शकले नाही. संपूर्ण इंग्लंडचा संघ १०१ या धावसंख्येवर बाद झाला. भारताला विजयासाठी १७३ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. भारताने ६ गडी गमवून हे लक्ष्य गाठलं.

चौथ्या कसोटीसाठी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश; शार्दूल ठाकूर, उमेश यादवचं काय?

या सामन्यानंतर भारताने या मैदानावर ८ कसोटी सामने खेळले. त्यात तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि पाच सामने अनिर्णित ठरले. तर २००७ नंतर भारताने या मैदानात ३ कसोटी सामने खेळले. त्यात तिन्ही सामन्यात पराभव सहन करावा लागला. १८ ऑगस्ट २०११ ला एक डाव आणि ८ धावा, १५ ऑगस्ट २०१४ ला एक डाव आणि २४४ धावा आणि ७ सप्टेंबर २०१८ ला ११८ धावांनी पराभव झाला होता.

Test Cricket Ranking: रोहित शर्मा टॉप ५ मध्ये; कर्णधार विराट कोहली पाच वर्षात पहिल्यांदाच…!

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मैदानात दोन कसोटी सामने खेळला आहे. दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. धोनीनंतर आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मैदानात दुसऱ्यांदा कसोटी सामना खेळणार आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये या मैदानात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ पराभूत झाला होता.