India vs England 5th T20I Highlights: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी- २० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना साऊथॅम्पटनच्या मैदानावर पार पडला. भारतीय संघ या मालिकेत ०-३ ने पिछाडीवर होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने २५७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने पूर्ण जोर लावला. पण भारताला हा सामना ५६ धावांनी गमवावा लागला आहे. यासह इंग्लंडने ही मालिका ४-० ने आपल्या नावावर केली.

इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण भारताला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अभिषेक शर्मा अवघ्या ३ धावा करुन माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसनने २७ धावांचे योगदान दिले. इशान किशनने एका बाजून जोर लावला. त्याने ५६ धावांचे योगदान दिले. पण आदिल रशिदने त्याला बाद करत माघारी धाडलं. तर कर्णधार श्रेयस अय्यर या महत्वाच्या सामन्यात २८ धावा करुन माघारी परतला. शेवटी तिलक वर्माने अर्धशतकी खेळी केली. पण भारतीय संघाला २०१ धावांपर्यंत मजल मारता आली.

इंग्लंडने उभारला २५७ धावांचा डोंगर

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला फिल सॉल्ट स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर जोस बटलर आणि हॅरी ब्रूकने मिळून विक्रमी भागीदारी केली. जोस बटलरने ६४ चेंडूंचा सामना करत १३१ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रूकने नाबाद ९५ धावा केल्या. जेकब बेथेल शून्यावर माघारी परतला. तर विल जॅक्सने नाबाद ७ धावा केल्या. यासह इंग्लंडने २० षटकांअखेर ३ गडी बाद २५७ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना शिवम दुबेने २ आणि प्रसिध कृष्णाने १ गडी बाद केला.

भारतीय संघाचा ४-० ने सुपडा साफ

या मालिकेत भारतीय संघाकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर पुढील सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरा सामना इंग्लंडने ४ गडी राखून आपल्या नावावर केला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने १२५ धावांनी विजय मिळवला होता. तर चौथ्या सामन्यात ९ गडी राखून बाजी मारली होती. आता पाचव्या सामन्यात ५६ धावांनी विजय मिळवला आहे. यासह इंग्लंडने पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकली आहे.