बर्मिगहॅम :मोहम्मद सिराजसह वेगवान चौकडीच्या प्रभावी माऱ्यानंतर चेतेश्वर पुजाराने (१३९ चेंडूंत नाबाद ५० धावा) केलेल्या संयमी खेळीमुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील वर्चस्व  कायम राखले. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांत आटोपल्यामुळे भारताला १३२ धावांची बहुमूल्य आघाडी मिळाली. त्यानंतर भारताची तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद १२५ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे एकूण २५७ धावांची आघाडी होती.  

भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने तिसऱ्या दिवशी ५ बाद ८४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स (३६ चेंडूंत २५) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी ६६ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर स्टोक्सला शार्दूल ठाकूरने जीवदान दिले, परंतु याचा त्याला फारसा फायदा घेता आला नाही. शार्दूलने त्याला बाद करत ही जोडी फोडली.

त्यानंतर बेअरस्टोला सॅम बिलिंग्जची (५७ चेंडूंत ३६) उत्तम साथ लाभली. या दोघांनी सातव्या गडय़ासाठी ९२ धावांची भर घातली. बेअरस्टोने अप्रतिम फलंदाजी करताना सिराजच्या गोलंदाजीवर एक धाव काढत आपले अर्धशतक, तर शार्दूलच्या गोलंदाजीवर चौकार मारत आपले कसोटी कारकीर्दीतील ११वे शतक झळकावले. अखेर १४० चेंडूंत १४ चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने १०६ धावांची खेळी केल्यावर बेअरस्टोला शमीने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. मग सिराजपुढे इंग्लंडचा डाव गडगडला. सिराजने अखेरचे तीन गडी झटपट माघारी पाठवल्यामुळे ६ बाद २४१ धावांवरून इंग्लंडचा डाव २८४ धावांत आटोपला.

भारताकडून सिराज (४/६६), कर्णधार जसप्रीत बुमरा (३/६८), शमी (२/७८) आणि शार्दूल ठाकूर (१/४८) या वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली.

त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावाची अडखळती सुरुवात झाली. जेम्स अँडरसनने शुभमन गिल (४), तर स्टुअर्ट ब्रॉडने हनुमा विहारीला (११) माघारी पाठवले. यानंतर एकीकडे पुजारा सावध फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने विराट कोहलीने (४० चेंडूंत २०) काही चांगले फटके मारले. मात्र, स्टोक्सच्या अधिक उसळी घेतलेल्या चेंडूवर कोहली बाद झाला. मग पुजाराला पहिल्या डावातील शतकवीर ऋषभ पंतची (४६ चेंडूंत नाबाद ३०) साथ लाभली.  

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ४१६

’ इंग्लंड (पहिला डाव) : ६१.३ षटकांत सर्वबाद २८४ (जॉनी बेअरस्टो १०६, सॅम बििलग्ज ३६, जो रूट ३१; मोहम्मद सिराज ४/६६, जसप्रीत बुमरा ३/६८, मोहम्मद शमी २/७८)

’ भारत (दुसरा डाव) : ४५ षटकांत

३ बाद १२५ (चेतेश्वर पुजारा नाबाद ५०, ऋषभ पंत नाबाद ३०; बेन स्टोक्स १/२२)

रोहित करोनामुक्त

भारताचा कर्णधार रोहित शर्माचा करोना चाचणीचा अहवाल रविवारी नकारात्मक आला आहे. करोनामुक्त झाल्यामुळे रोहित ७ जुलैपासून खेळवण्यात येणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी उपलब्ध असेल. रोहितला

२४ जूनला करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला मुकावे लागले. मात्र, आता तो करोनातून सावरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘‘रोहितचा करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आला आहे. त्यामुळे इंग्लंडमधील वैद्यकीय नियमांनुसार, त्याचा विलगीकरणाचा कालावधीही संपुष्टात आला आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाऱ्याकडून रविवारी सांगण्यात आले.