Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी भारताने ६० धावांनी गमावली आणि इंग्लंडने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. या मालिकेत काही ठराविक फलंदाज वगळता इतर फलंदाज आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. चौथ्या कसोटीतही फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. मधल्या फळीतील फलंदाजांनी वाईट कामगिरी केली. त्यामुळे पुन्हा एकदा संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दरम्यान कसोटी सामन्यांसाठी मुंबईकर रोहित शर्माला संघात न घेणे, हि भारतीय निवड समितीची मोठी चूक आहे, असा टीका भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी केली आहे.

रोहितला संघात स्थान न देणे ही मोठी चूकच आहे. त्याची खेळी चांगली आणि सातत्यपूर्ण नसल्यामुळे त्याला वगळण्यात आले याची मला कल्पना आहे. पण इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर रोहितसारखा चांगले स्ट्रोक खेळणारा खेळाडू संघात असणे महत्वाचे होते. पण तसे झाले नाही. चांगला स्ट्रोक खेळू शकणाऱ्या रोहितला भारताने वगळले आणि त्याच्या जागी बचावात्मक पवित्रा असलेले खेळाडू संघात घेतले. रोहितला संघात स्थान देणे हे विराटसाठी फायद्याचे ठरले असते, असे ते म्हणाले.

तिसऱ्या कसोटीनंतर सलामीवीर मुरली विजयला वगळण्यात आले. त्या जागी रोहित शर्मा याची निवड करता आली असती. पण निवड समितीने युवा पृथ्वी शॉ याची निवड केली आणि त्याला चौथ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. कर्णधार कोहलीने चौथ्या कसोटीतही पुन्हा राहुल-धवन जोडीवर विश्वास दाखवला. या दोघांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. त्यांनी दोन डावांत अनुक्रमे ३७ व ४ धावांची भागीदारी केली. याकडे वेंगसरकर यांनी लक्ष वेधत रोहितला संघात न निवडण्याची चूक महागात पडली, असेही त्यांनी सांगितले.