भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली एजबस्टन कसोटी रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. भारताने आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली आहे. हे इंग्लंडला दुसऱ्या डावात मिळालेले आतापर्यंतचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. आतापर्यंत इंग्लंडचा कसोटी संघ एवढे मोठे लक्ष्य यशस्वीपणे पार करू शकलेला नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. तेव्हा बेन स्टोक्सच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर संघाने ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. सध्या सुरू असलेल्या एजबस्टन कसोटीमध्ये भारताने इंग्लंडला ३७८ धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना ऐतिहासिक खेळी करावी लागेल.

हेही वाचा – ‘ही तर माझी किमया’, बायकोने लुटले नवऱ्याच्या कामगिरीचे श्रेय!

चेतेश्वर पुजाराच्या ६६ आणि ऋषभ पंतच्या ५७ धावांच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात २४५ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताला दोन्ही डावांतील मिळून एकूण ३७७ धावांची आघाडी मिळाली. भारताने दिलेले लक्ष्य जर इंग्लंडने यशस्वीपणे पार केले तर पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडण्यात यजमानांना यश येईल. मात्र, जर भारतीय गोलंदाजांनी यजमानांना लवकर गुंडाळले तर भारत मालिका जिंकून इतिहास रचेल.