Virat Kohli and Jonny Bairstow Sledging : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा तिसरा दिवस विराट कोहली व जॉनी बेयरस्टोच्या वादामुळे गाजला. दोघांमधील शाब्दिक बाचाबाचीची प्रचंड चर्चा झाली. इतकेच काय तर या प्रकरणी विरेंद्र सेहवागने केलेले ट्वीटसुद्धा प्रचंड व्हायरल झाले. जॉनी बेअरस्टोने मात्र, हलक्या-फुलक्या पद्धतीने या प्रकरणावर पडदा टाकला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जॉनी बेअरस्टोला मैदानात झालेल्या वादाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, “आम्ही गेल्या १० वर्षांपासून एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. आम्ही सध्या कसोटी क्रिकेट खेळतो आहोत आणि एकमेकांचे स्पर्धक आहोत. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करण्याच्या प्रत्नात आहोत. कारण, दोघांनाही या स्पर्धेत आपापल्या संघाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आम्ही करतो. झालेला वाद हा खेळाचा भाग आहे. काळजी करू नका आम्ही रात्रीचे जेवण एकत्रच करणार आहोत”.

हेही वाचा – IND vs ENG : विराट-बेअरस्टोच्या वादावर विरेंद्र सेहवागचे मजेशीर ट्वीट व्हायरल; म्हणाला…

इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना ३२व्या षटकात विराट आणि जॉनी दरम्यान वाद झाला होता. विराट कोहली स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. शामीने फेकलेला चेंडू बेअरस्टोच्या अंगावर लागला. त्यानंतर विराट कोहली बेअरस्टोला काहीतरी बोलला. बेअरस्टोनेही त्याला उत्तर दिले. यानंतर विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

दोघांना शांत करण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पंच अलीम दार आणि रिचर्ड केटलबरो यांनी कोहली आणि बेअरस्टोला शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर वातावरण थोडे शांत झाले. शामीचे षटक संपल्यानंतर कोहली आणि बेअरस्टो एकमेकांशी हसत बोलताना दिसले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर बेअरस्टोने देखील आपली प्रतिक्रिया देऊन वादावर पडदा टाकला.