IND vs ENG Edgbaston Test : अर्धवट राहिलेली पाच कसोटी सामन्यांची मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तो एजबस्टन येथे होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे चाहते सध्या फार आनंदी झाले आहेत. त्याच्या एका लहानग्या चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जसप्रीत बुमराहकडे कसोटी संघाचे कर्णधारपद दिले आहे. त्यामुळे ३५ वर्षांनंतर एखादा वेगवान गोलंदाज भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी कपिल देव यांना अशी संधी मिळाली होती. यापार्श्वभूमीवर त्याच्या चाहत्यांनी त्याचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे. तर, मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओतील मुलगा आपल्या बोबड्या बोलीमध्ये जसप्रीत बुमराहला पाठिंबा देताना दिसत आहे. या व्हिडीओवर सोशल मीडिया युजर्सनी लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे.

दरम्यान, आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाने २-१ अशी आघाडी मिळवलेली आहे. जवळपास नऊ महिन्यांच्या अंतरानंतर खेळवल्या जाणाऱ्या शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. जसप्रीत बुमराहने या मालिकेतील चार सामन्यांतील सात डावात २०.८३ च्या सरासरीने १८ बळी मिळवलेले आहेत.