Vaibhav Sooryavanshi Wicket: बॉस बेबी वैभव सूर्यवंशीने इतिहास रचत टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं. वैभवची भारताच्या टी-२० संघात निवड झाल्यापासून त्याच्या पदार्पणाची सर्वच जण वाट पाहत होते, पण अखेरीस मँचेस्टरमधील इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी अखेरीस मिळाली. पण वैभवला पहिल्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. वैभव २ षटकारांसह १४ धावा करत स्टंपिग होत बाद झाला. इंग्लंडने वैभवसाठी केलेला गृहपाठ इथे कामी आला.

इंग्लंडने या सामन्यासाठी ठोस रणनीती आखली होती. अलीकडच्या काळात संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली, तरी भारताकडून खेळणाऱ्या सर्वात युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी त्यांनी सखोल तयारी केली होती. नाणेफेकीवेळी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला, “वैभवला रोखण्यासाठी आमच्याकडे काही खास डावपेच आहेत. आता ते मैदानात प्रभावीपणे अंमलात आणायचे आहेत.”

गेल्या तीन सामन्यांतील संजू सॅमसनच्या निराशाजनक कामगिरीमुळे मँचेस्टरमध्ये वैभव सूर्यवंशीचं आंतरराष्ट्रीय पदार्पण जवळपास निश्चित मानलं जात होतं. याची कल्पना असल्याने इंग्लंडने त्याच्याविरुद्ध खास रणनीती आखली होती. अर्थात, वैभवसारख्या प्रतिभावान फलंदाजाविरुद्ध प्रत्येक वेळी योजना यशस्वी होईलच असं नाही, पण या सामन्यात इंग्लंडचा डावपेच अचूक ठरला. वैभवला अवघ्या १० चेंडूंमध्ये १४ धावांवर समाधान मानावं लागलं.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वैभववर वेगवान आणि उंच उसळी घेणाऱ्या चेंडूंचा मारा केला. प्रत्येक चेंडू जणू त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची खरी परीक्षा काय असते, याची जाणीव करून देत होता. जोश टंगच्या पहिल्या दोन चेंडूंवर वैभवने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही वेळा तो चेंडूला स्पर्शही करू शकला नाही. अखेर १४५ किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या यॉर्करवर चेंडू बॅटच्या आतील कडेवर लागून एक धाव मिळाली आणि अशा साध्या पद्धतीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या धावेची नोंद झाली.

एकदा जोफ्रा आर्चरला वैभव सूर्यवंशीच्या कमकुवत बाजूबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर तो हसत म्हणाला होता, “आयपीएल संपल्यानंतर सांगतो.” मँचेस्टरमध्ये त्याने ती माहिती जणू योग्य वेळ येईपर्यंत जपून ठेवली होती. राजस्थान रॉयल्समधील आपल्या सहकाऱ्याविरुद्ध टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर आर्चरकडून चूक झाली आणि वैभवने त्यावर षटकार ठोकला. मात्र त्यानंतर आर्चरने लगेचच आपल्या टप्प्यात बदल करत चेंडू अधिक मागे टाकण्यास सुरुवात केली.

तरीही जेव्हा जेव्हा चेंडू पुढे टाकला गेला, तेव्हा वैभवने फटका मारण्याची संधी सोडली नाही. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने सहज वाटणारा, पण ताकदीने खेळलेला फटका मारत मिडविकेटच्या दिशेने षटकार ठोकला. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला लय मिळवू दिली नाही.

चौथ्या षटकात ऑफस्पिनर विल जॅक्सला गोलंदाजीसाठी आणण्यात आलें. त्याने वैभवला पहिलाच चेंडू अवघ्या ८० किमी प्रतितास वेगाने टाकला. तो चेंडू वैभवने सावधपणे खेळला. त्यानंतर पुढील चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण हा ९४ किमी प्रतितास वेगाचा स्लायडर होता. वैभवचा चेंडूशी संपर्कच झाला नाही. तो पूर्णपणे फसला आणि त्याने सावरायच्या आतच यष्टीरक्षक जोस बटलरने चपळाई दाखवत स्टम्पिंग केलं.\

वैभवपेक्षा तब्बल दोन दशकांनी मोठा असलेला बटलर विकेटमागे आजही तितकाच सतर्क असल्याचं त्याने दाखवून दिलं. आयपीएलमध्ये वैभवने वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंवर अनेकदा आक्रमक फटके खेळले आहेत. मात्र, मँचेस्टरमधील वाऱ्याच्या वातावरणात त्याच्यासमोर वेगळं आव्हान होतं. इंग्लंडची रणनीती यशस्वी ठरली, तरीही वैभवने खेळलेल्या काही अप्रतिम फटक्यांनी त्याच्यातील असामान्य प्रतिभेची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली. त्याची कारकीर्द उज्ज्वल असेल, याचे संकेत या छोट्याशा खेळीतूनही स्पष्टपणे मिळाले.