गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही देशांदरम्यान १ ते ५ जुलै या कालावधीमध्ये मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र, एजबस्टन येथे होणार्‍या भारत-इंग्लंड कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) अधिकार्‍यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या चिंतेचे कारण कोकेन आहे. कोकेनमुळे मैदानावरील चाहत्यांच्या समाजविरोधी वर्तनाला चालना मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील अनेक क्रिकेट प्रशासकांनी चाहत्यांच्या मैदानावरील वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन वर्षांच्या कोविड प्रतिबंधानंतर स्टेडियममध्ये चाहत्यांची गर्दी पूर्ववत झाली आहे. खेळादरम्यान अनेक चाहते आक्षेपार्ह वर्तणूक करतात. त्यांच्या अशा वर्तणुकीसाठी अति प्रमाणात मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन कारणीभूत असल्याचे ईसीबी अधिकाऱ्यांना वाटते.

हेही वाचा – Video : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यादरम्यान प्रेक्षकांची तुंबळ हाणामारी

गेल्या वर्षी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यादरम्यान केएल राहुल सीमेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याच्यावर बिअर आणि शॅम्पेन कॉर्क फेकले होते. भारताचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने एका घटनेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. चाहत्यांनी फेकलेल्या वस्तू परत त्यांच्याच अंगावर फेकण्याचा इशारा कोहलीने राहुलला केला होता.

ताजे उदाहरण घ्यायचे ठरले तर, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हेडिंग्ले येथील वेस्टर्न टेरेसमध्ये चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अशा घटनांमुळे ईसीबीच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यानचा पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना बघण्यासाठी अनेक चाहते आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही उपद्रवी चाहत्यांमुळे मैदानावर उपस्थित असलेल्या महिला आणि लहान मुलांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो, अशी भीती ईसीबीला आहे.

हेही वाचा – विराट कोहलीला प्रपोज करणारी इंग्लंडची क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरसोबत गेली लंच डेटवर!

त्यामुळे ईसीबीने प्रेक्षकांना एक मेसेज सुविधा प्रदान केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये काही अप्रिय गोष्टी घडल्यास नियंत्रण कक्षाला त्वरीत त्यांची माहिती मिळेल. काऊंटी प्रमुखांनी तर सामन्यांना उपस्थित राहणाऱ्या चाहत्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. जो प्रेक्षक गैरवर्तन करताना दिसेल त्याच्यावर आजीवन बंदी घातली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng english cricket board concerned over cocaine fuelling cricket fans ahead of edgbaston test vkk
First published on: 28-06-2022 at 18:37 IST