IND vs ENG U19 World Cup 2026 Live Updates in Marathi: भारतीय संघ अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा चॅम्पियन ठरला आहे. भारताने अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड संघावर १०० धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला ४०.२ षटकांत ३११ धावांवर सर्वबाद केलं आणि सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताच्या गोलंदाजांनीही शानदार कामगिरी करत ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या. भारताने प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या वादळी खेळीच्या बळावर ४११ धावांचा डोंगर उभारला होता. गोलंदाजीत अंबरीशने ३ विकेट्स पटकावल्या.
इंग्लंडच्या फाल्कनरचं शतक
इंग्लंडचा खालच्या फळीतील फलंदाज फाल्करनने ६३ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं आहे.
टीम इंडियाच्या खात्यात नववी विकेट
अंबरीशने ३८व्या षटकात लम्बसडेनला झेलबाद करत संघाला नववी विकेट मिळवून दिली. वेदांत त्रिवेदी कमालीचा झेल टिपला. अंबरीशच्या या सामन्यातील ही तिसरी विकेट होती.
आठवी विकेट
अंबरीशने ३६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मिन्टोला झेलबाद करत संघाला आठवी विकेट मिळवून दिली. त्याने ९२ धावांची ही भागीदारी तोडली. यासह आता भारताला विजयासाठी २ विकेट्सची गरज आहे.
इंग्लंडचा पलटवार
फाल्कोनर-मिन्टोने ८८ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला आहे. फाल्कोनर ७३ धावा तर जेम्स मिंन्टो २७ धावा करत खेळत आहे. ३४ षटकांत इंग्लंडने ७ बाद २६५ धावा केल्या आहेत. आता १६ षटकांत इंग्लंडला विजयासाठी १४७ धावांची गरज आहे.
दीपेशने मिळवून दिली सहावी विकेट
दीपेश देवेंद्रनच्या २२व्या षटकात फरहान अहमदला बाद करत त्याने संघाला सहावी विकेट मिळवून दिली.
आयुषच्या एका षटकात दोन विकेट्स
आयुष म्हात्रे २१वं षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने त्याच षटकात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. अर्धशतकी खेळी केलेल्या डॉकिन्सला त्याने झेलबाद केलं. डॉकिन्स ६५ धावा करत बाद झाला. तर षटकातील अखेरच्या चेंडूवर दोन फलंदाजांमधील समन्वयामुळे नुकताच आलेला अल्बर्ट धावबाद होत माघारी परतला. यासह २१ षटकांत इंग्लंड ५ बाद १७४ धावांवर आहे.
डॉकिन्सचं अर्धशतक
या रन चेसमध्ये इंग्लंडचा सलामीवीर डॉकिन्सनने अर्धशतक झळकावलं आहे. डॉकिन्सनने ४९ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह अर्धशतक केलं. २० षटकांत इंग्लंडने ३ बाद १७१ धावा केल्या आहेत.
भारताच्या खात्यात तिसरी विकेट
१८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कनिष्क चौहानने इंग्लंडच्या कर्णधाराला झेलबाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली.
इंग्लंडने पहिल्या पॉवरप्लेमध्ये किती धावा केल्या?
बेन डॉकिन्स व बेन मेयस यांनी पहिल्या विकेटनंतर संघाचा डाव सावरला आहे. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत पॉवरप्लेमध्ये १ बाद ६४ धावा केल्या आहेत.
भारताच्या खात्यात पहिली विकेट
मेडन षटक टाकत सुरूवात केलेल्या अंबरीशने पाचव्या षटकात जोसेफला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिली. जोसेफने हेनिलच्या षटकात चौकारांची हॅटट्रिक लगावली होती. यासह ५ षटकांत इंग्लंडने १ बाद १९ धावा केल्या आहेत.
सामन्याला सुरूवात
भारताने दिलेल्या ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचा संघ उतरला आहे. बेन डॉकिन्स व जोसेफ मूर्स ही जोडी मैदानावर आहे. तर अंबरीश पहिलंच मेडन षटक टाकलं.
भारताने उभारली विक्रमी धावसंख्या
कनिष्क चौहानने अखेरच्या षटकात १८ धावा कुटत संघाला ४०० धाांच्या पलीकडे नेलं. आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय अगदी योग्य ठरला. भारताकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक १७५ धावांची खेळी केली. तर आयुष म्हात्रेने ५३ धावा, विहान-वेदांतची अर्धशतकी भागीदारी, अभिज्ञान कुंडूच्या झटपट ४० धावा आणि कनिष्क चौहानने २० चेंडूत ३७ धावांची खेळी केली. या फटकेबाजीच्या बळावर टीम इंडियाने फायनलमध्ये ९ बाद ४११ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. यासह इंग्लंडला विजयासाठी भारताने ४१२ धावांचं मोठं आव्हान दिलं.
आठवी विकेट
मॉर्गनने ४७व्या षटकात खिलन पटेलला झेलबाद करत संघाला आठवी विकेट मिळवून दिली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या धावांना ब्रेक लावत चांगलं पुनरागमन केलं. यासह ४७ षटकांत भारताने ८ बाद ३७६ धावा केल्या आहेत. आता भारत ४०० धावा गाठणार का यावर नजरा असतील.
अभिज्ञान कुंडूची वादळी फटकेबाजी
अभिज्ञान कुंडूने ३१ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ४० धावांची खेळी बाद झाला. अभिज्ञानने गियर बदलत संघासाठी महत्त्वपूर्ण धावा कुटल्या. यासह टीम इंडियाने ४४.३ षटकांत ६ बाद ३६० धावा केल्या आहेत.
भारताला पाचवा धक्का
३७व्या षटकात जेम्स मिन्टोने भारताला अजून एक धक्का दिला. त्याने सेट फलंदाज वेदांत त्रिवेदीला झेलबाद करवत संघाला पाचवी विकेट मिळवून दिली. वेदांत ३५ धावा करत बाद झाला. लागोपाठ विकेट्स गेल्यानंतर भारताच्या धावांना ब्रेक लागला आहे. तर भारताने आता ४० षटकांत ५ बाद ३१९ धावा केल्या आहेत.
भारताला चौथा धक्का
३५व्या षटकात जेम्स मिन्टोने उपकर्णधार विहान मल्होत्राची विकेट मिळवली. विहान मल्होत्रा बाद होण्यापूर्वी ३६ धावांची खेळी केली.
भारताच्या ३०० धावा पूर्ण
वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर विहान मल्होत्रा व वेदांत त्रिवेदी यांनी संघाचा डाव उचलून धरला. दोघांनीही कमालीचा डिफेन्स करत प्रसंगी चौकारांची आतिषबाजी केली.३४व्या षटकात टीम इंडियाने ३०० धावांचा पल्ला गाठला आहे. तर या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. त्यामुळे १५ षटकांचा खेळ शिल्लक असताना टीम इंडिया किती धावांचं आव्हान देणार यावर सर्वांच्या नजरा असतील.
वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी बाद
वैभव सूर्यवंशी २६व्या षटकात झेलबाद झाला. इंग्लंडचा अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेतील यशस्वी गोलंदाज लुम्सडेनने वैभवला बाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. वैभव ८० चेंडूत १५ चौकार व १५ षटकारांसह १७५ धावा करत झेलबाद झाला.
वैभव सूर्यवंशीचं दीडशतक
वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत शतक केल्यानंतर आता फक्त ७१ चेंडूत १५० धावांचा टप्पा गाठला. वैभवने शतकानंतर अवघ्या १६ चेंडूत दीडशतक पूर्ण केलं. यासह भारताने २३ षटकांत २ बाद २२४ धावा केल्या आहेत.
वैभव सूर्यवंशीचं शतक
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची अंडर-१९ विश्वचषकात बॅट तळपली आहे. वैभव सूर्यवंशीने अवघ्या ५५ चेंडूत ८ चौकार व ८ षटकारांसह शतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. यासह २२ षटकांत भारताने २०० धावांचा पल्ला पार केला.
आयुष म्हात्रेचं अर्धशतक
कर्णधार आयुष म्हात्रेने ५० चेंडूत ७ चौकार २ षटकारांसह ५३ धावांची खेळी करत अर्धशतक झळकावलं. पण एलेक्स ग्रीनच्या २० षटकातील पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
भारताच्या १५० धावा पूर्ण
वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रेच्या जोडीने शतकी भागीदारी रचत संघाचा डाव उचलून धरला आहे. भारतीय संघाने १८ षटकात १५० अधिक धावांचा पल्ला पार केला. आयुष अर्धशतकाजवळ तर वैभव शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक
वैभव सूर्यवंशीने ३२ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह दणदणीत अर्धशतक झळकावलं आहे. तर आयुष म्हात्रेसह त्याने ७१ धावांची भागीदारी रचली आहे.
आयुष-वैभवची जोडी जमली
वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रे या जोडीने पहिली विकेट गमावल्यानंतर संघाचा डाव सावरला आहे. वैभव-आयुषने अर्धशतकी भागीदारी रचली आहे. यासह टीम इंडियान १० षटकांत १ बाद ७९ धावा केल्या आहेत.
भारताला पहिला धक्का
भारताला अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमध्ये पहिला धक्का बसला. एलेक्स ग्रीनने चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर आरोन जॉर्जला झेलबाद करत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. यासह टीम इंडियाने ४ षटकांत १ बाद २० धावा केल्या आहेत.
अंतिम सामन्याला सुरूवात
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून आरोन जॉर्ज व वैभव सूर्यवंशी जोडी मैदानावर उतरली आहे.
भारत अंडर-१९ संघाची फायनलसाठी प्लेइंग इलेव्हन:
आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), आर एस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन
बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मायेस, थॉमस रीव्ह (यष्टीरक्षक/कर्णधार), कॅलेब फाल्कोनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, ॲलेक्स ग्रीन
नाणेफेक
भारत आणि इंग्लंड अंडर-१९ विश्वचषक अंतिम सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इंग्लंडचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.
नाणेफेकीची वेळ
भारत आणि इंग्लंड अंतिम सामन्याची नाणेफेक १२.३० वाजता होणार असून १ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.
भारत वि. इंग्लंड
भारत आणि इंग्लंड यांच्यात हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही.
