Edgbaston Test : अर्धवट राहिलेली पाच कसोटी सामन्यांची मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तो एजबस्टन येथे होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर, ऋषभ पंत उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत माहिती दिली आहे. बुमराहकडे कसोटी संघाचे कर्णधारपद गेल्यामुळे ३५ वर्षांनंतर एखादा वेगवान गोलंदाज भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी कपिल देव यांना अशी संधी मिळाली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पाच कसोटी सामन्याची मालिका गेल्यावर्षी आयोजित करण्यात आली होती. या मालिकेला ‘पतौडी करंडक’ असे नाव देण्यात आलेले आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये भारतीय संघाने २-१ अशी आघाडी मिळवलेली आहे. जवळपास नऊ महिन्यांच्या अंतरानंतर खेळवल्या जाणाऱ्या शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा कर्णधार असेल. जसप्रीत बुमराहने या मालिकेतील चार सामन्यांतील सात डावात २०.८३ च्या सरासरीने १८ बळी मिळवलेले आहेत.

या मालिकेत भारताचे नेतृत्व करणारा बुमराह दुसरा कर्णधार ठरेल. गेल्या वर्षी खेळलेल्या चार सामन्यांसाठी विराट कोहली भारताचा कर्णधार होता. भारतीय संघात करोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर शेवटचा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या चार सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. हे दोन्ही खेळाडू प्रकृतीच्या कारणामुळे पाचवा सामना खेळणार नाहीत.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : इतिहास रचण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार भारत; जाणून घ्या कसे असतील संघ

या वर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बुमराहची भारताच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा तो म्हणाला होता, ‘जर भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर मी मागे हटणार नाही.’ सध्या केएल राहुल जखमी असल्याने आणि रोहितला करोनाची लागण झाल्याने बुमराहसाठी ही संधी लवकरच चालून आली.

ज्याप्रमाणे कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये भारतीय संघाला विश्वचषक मिळवून दिला होता. त्याचप्रमाणे आता बुमराह भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणार का? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.