Ravindra Jadeja Wicket: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार बर्मिंघममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना, कर्णधार शुबमन गिलने १५० धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण जोश टंगने टाकलेल्या भन्नाट बाऊन्सरमुळे जडेजाला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

या डावात फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जैस्वालने ८७ धावांची दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर गेल्या सामन्यातील दोन्ही डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत या डावात २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि शुबमन गिलने महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी सहाव्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. यादरम्यान जडेजा ८९ धावांवर माघारी परतला.

घातक बाऊन्सरवर पडली जडेजाची विकेट

तर झाले असे की, इंग्लंडकडून १०८ वे षटक टाकण्यासाठी जोश टंग गोलंदाजीला आला. या षटकातील तिसरा चेंडू टंगने बाऊन्सर टाकला. हा चेंडू जडेजाने सोडण्याचा प्रयत्न केला. पण हा चेंडू जडेजाच्या दिशेने वेगाने आला. जो जडेजाच्या ग्लोव्ह्जला लागून यष्टीरक्षक जेमी स्मिथच्या हातात गेला. यासह जडेजाच्या खेळीचा शेवट झाला. जडेजा आणि गिल यांनी मिळून २०० धावांची भागीदारी केली. जडेजाचं शतक अवघ्या ११ धावांनी हुकलं.

भारतीय संघाच्या ४०० धावा पूर्ण

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नाही. भारताला सुरूवातीला मोठा धक्का बसला. केएल राहुल स्वस्तात २ धावा करत माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि करूण नायरने मिळून भारताचा डाव सावरला.

भारताकडून यशस्वी जैस्वालने ८७ धावांची दमदार खेळी केली. तर करूण नायर ३१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतने २५ धावांची खेळी केली. नितीश कुमार रेड्डी १ धाव करत माघारी परतला.भारताकडून गिलने १५० पार तर जडेजाने ८९ धावांची खेळी केली.भारतीय संघाने ४०० धावांचा पल्ला गाठला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.