T20 World Cup 2026 2nd Semi Final, India vs England Live Scorecard Updates: टी-२० विश्वचषक २०२६च्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये अटीतटीच्या लढतीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. रविवारी अंतिम लढतीत भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुकाबल्यात भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना जेकब बेथेलच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने २४६ धावांची मजल मारली. अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या संजू सॅमसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Live Updates

IND vs ENG Highlights, ICC Men’s T20 World Cup 2026 2nd Semi Final: भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ सेमीफायनल हायलाईट्स

22:52 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: टीम इंडिया फायनलमध्ये; बेथेलची शतकी झुंज व्यर्थ

अतिशय अटीतटीच्या सेमी फायनलच्या लढतीत भारतीय संघाने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली.

22:48 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: हार्दिकचा अफलातून थ्रो, शतकवीर बेथेल तंबूत

हार्दिक पंड्याच्या थ्रो मुळे शतकवीर जेकब बेथेल रनआऊट झाला. या विकेटसह भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.

22:43 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: शेवटच्या षटकात इंग्लंडला हव्यात ३० धावा

हार्दिक पंड्याने १९व्या षटकात फक्त ९ धावा देत भारताला विजयासमीप नेलं.

22:42 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: तिलक वर्माचा सुरेख झेल, सॅम करन माघारी

हार्दिक पंड्याने सॅम करनला बाद करत भारतीय संघाला विजयासमीप नेलं.

22:38 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: जसप्रीत बुमराहचा शिस्तबद्ध मारा

जसप्रीत बुमराहने चौथ्या षटकात केवळ ६ धावा देत भारतीय संघाचा विजय दृष्टिक्षेपात आणला.

22:32 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: अर्शदीपच्या षटकात बेथेलने वसूल केले चौकार, षटकार

इंग्लंडने अर्शदीप सिंगच्या षटकात १६ धावा वसूल करत लक्ष्य आटोक्यात राहील याची काळजी घेतली.

22:25 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: जसप्रीत बुमराहचा भेदक मारा

जसप्रीत बुमराहने फक्त ८ धावा देत इंग्लंडच्या धावसंख्येला वेसण घातली.

22:21 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: वरुणच्या ४ ओव्हरमध्ये इंग्लंडने लुटल्या ६४ धावा

वरुण चक्रवर्तीला लक्ष्य करत इंग्लंडने त्याच्या ४ षटकात ६४ धावा वसूल केल्या.

22:15 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: अक्षरचा अद्भुत झेल, विल जॅक्स माघारी

अर्शदीपच्या गोलंदाजीवर विल जॅक्सने लगावलेला फटका डीप पॉइंट क्षेत्रात गेला. अक्षर पटेलने प्रचंड अंतर कापून झेल टिपला. मात्र तो सीमारेषेबाहेर जाणार लक्षात आल्यानंतर त्याने चेंडू शिवम दुबेकडे सोपवला. त्याने झेल पूर्ण केला.

22:07 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: इंग्लंडची वादळी फटकेबाजी

इंग्लंडने ४ विकेट्स गमावल्यानंतर जेकब बेथल व विल जॅक्स यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव उचलून धरला आहे. इंग्लंड संघाने १३ षटकांत ४ बाद १६० धावा केल्या आहेत. तर जॅक्स व बेथल यांनी ६५ धावांची भागीदारी रचली आहे. यासह इंग्लंडला विजयासाठी ४२ चेंडूत ९४ धावांची गरज आहे.

21:55 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: जेकब बेथलचं अर्धशतक

जेकब बेथलने अवघ्या १९ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांसह अर्धशतक झळकावलं आहे. यासह त्याने इंग्लंडच्या रन चेसमध्ये आशा कायम ठेवल्या आहेत. यासह इंग्लंडला विजयासाठी ५४ चेंडूत १२३ धावांची गरज आहे. इंग्लंडने ११ षटकांत ४ बाद १३५ धावा केल्या आहेत.

21:42 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: अक्षर पटेलच्या खात्यात पहिली विकेट

अक्षर पटेल ८वं षटक टाकण्यासाठी आला आणि टॉम बँटनने पहिल्या दोन्ही चेंडूंवर षटकार खेचले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर बँटनला क्लीन बोल्ड करत अक्षरने बदला घेतला. यासह ८ षटकांत इंग्लंडने ८ बाद ९९ धावा केल्या आहेत.

21:31 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: वरूण चक्रवर्ती स्ट्राईक

वरूण चक्रवर्ती पॉवरप्लेमधील अखेरचं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील पहिल्या ३ चेंडूंवर जेकब बेथलने षटकार खेचले. यानंतर पाचव्या चेंडूवर वरूणने बटलरला क्लीन बोल्ड करत लगेच बदला घेतला. यासह पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने ३ बाद ६८ धावा केल्या आहेत.

21:24 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: बुमराहच्या पहिल्या चेंडूवर विकेट

जसप्रीत बुमराह चौथं षटक टाकण्यासाठी आला आणि बुमराहच्या स्लोअर बॉलवर त्याने बॅट पुढे टाकली. त्यासह चेंडू हवेत उंच उडाला, अक्षर पटेल २४ मीटर अंतर मागच्या दिशेने धावत जाऊन योग्यवेळी डाईव्ह मारत अफलातून कॅच पकडला.

21:08 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: हार्दिक पंड्याच्या खात्यात पहिली विकेट

हार्दिक पंड्याच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्ट खाली पाहून शॉट खेळायला गेला आणि चेंडू बॅटची कड घेत हवेत उंच उडाला आणि अक्षर पटेलने परफेक्ट झेल टिपला. यासह १३ धावांवर इंग्लंडने पहिली विकेट गमावली. अक्षरने झेल टिपल्यानंतर हार्दिकने त्याला किस दिली.

21:00 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: रनचेसला सुरूवात

भारताने दिलेल्या २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फिल सॉल्ट व जोस बटलरची जोडी उतरली आहे. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सुरूवात केली आहे. सॉल्ट व बटलर दोघांनी पहिल्या षटकात ३ चौकार लगावत १२ धावा केल्या. तर बटलरने कमालीच्या यॉर्करवर चौकार खेचला.

20:46 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: भारताने उभारला धावांचा डोंगर

हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकात २ षटकार लगावले आणि संघाला २५० धावांपर्यंत पोहोचवलं, यानंतर हार्दिक २ धावा घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. टीम इंडियाने वानखेडेच्या मैदानावर वादळी फटेकबाजी करत धावांचा पाऊस पाडला आणि २० षटकांत ७ बाद २५३ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने धावांचा डोंगर उभारत इंग्लंडला फायनल गाठण्यासाठी २५४ धावांचं मोठं लक्ष्य दिलं आहे.

२५४ धावा करत भारताने अनेक विक्रम केले आहेत. नॉकआऊट सामन्यात २५० धावसंख्या करणारा भारत पहिला संघ ठरला आहे. तर विश्वचषकात दोन वेळा २५० अधिक धावा करणाराही भारत पहिला संघ ठरला.

20:42 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: तिलक वर्माने आर्चरची केली धुलाई

तिलक वर्मा अखेरच्या षटकांत फलंदाजीला आला आणि त्याने १९व्या षटकात दणदणीत ३ षटकार लगावले आणि नंतर चौथ्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. यासह तिलक वर्मा ७ चेंडूत २१ धावा करत माघारी परतला. यासह १९व्या षटकात भारताने २० धावा कुटल्या.

20:30 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: शिवम दुबे रनआऊट

सॅम करन १८वं षटक टाकण्यासाठी आला आणि या षटकात हार्दिक पंड्याने शिवम दुबेला धावबाद केलं. हार्दिकने करनचा चेंडू टोलवला आणि एक धाव घेऊ की नको घेऊ नको या पद्धतीने पुढे आला, पण शिवम दुबे अर्ध क्रिज पुढे आला होता. हार्दिक मागे गेल्याने दुबे पुन्हा क्रिजकडे पळाला पण तोपर्यंत तो धावबाद झाला होता. यासह शिवम २५ चेंडूत १ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावा करत बाद झाला.

20:24 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: भारताच्या २०० धावा पूर्ण

टीम इंडियाने १७व्या षटकात २०० धावा पूर्ण केल्या आहेत. हार्दिकने १७व्या षटकात ३ चौकार लगावत २०० धावांचा पल्ला पार केला. हार्दिक १३ धावा तर शिवम दुबे ३७ धावांवर खेळत आहेत. भारताची टी-२० विश्वचषक इतिहासात फलंदाजी अपेक्षेप्रमाणे राहिली नव्हती, पण आता सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाने शानदार फटकेबाजी केली.

20:20 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: सूर्यादादा झेलबाद

१६व्या षटकात आदिल रशीदच्या षटकात शिवम व सूर्याने दोन षटकार खेचत चांगली सुरूवात केली. पण चौथ्या चेंडूवर गुगलीवर सूर्या स्टंपिग होत बाद झाला. यासह भारताला चौथा धक्का बसला. यासह भारताने १६ षटकांत ४ बाद १९० धावा केल्या आहेत.

20:15 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: १५ षटकांत भारताच्या किती धावा?

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर भारताच्या धावांचा वेग कमी झाला आहे. सध्या मैदानावर सूर्यकुमार यादव व शिवम दुबेची जोडी आहे. यासह १५ षटकांत भारताने ३ बाद १७७ धावा केल्या आहेत.

20:05 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: संजूचं शतक हुकलं!

विल जॅक्सला १४वं षटक टाकण्यासाठी बोलावलं आणि त्याने येताच भारताला तिसरा धक्का दिला. विल जॅक्सच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू झेलबाद झाला. पुन्हा एकदा संजूचं शतक हुकलं. यासह संजू ४२ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ८९ धावा करत झेलबाद झाला.

20:02 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: भारताच्या १५० धावा पूर्ण

भारताने १२.३ षटकांत १५० धावांचा पल्ला गाठला आहे. संजू सॅमसनने या सामन्यातही आपला वादळी फॉर्म कायम ठेवत फटकेबाजी करत या धावसंख्येत मोठी भूमिका बजावली. यासह भारताने १३ षटकांत २ बाद १६० धावा केल्या आहेत. संजू आता शतकाच्या ११ धावा जवळ आहे.

19:46 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: इशान किशन बाद

आदिल रशीद १०वं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इशानने चौकार खेचला आणि तिसऱ्या चेंडूवर पुढे येत मोठा फटका खेळायला गेला पण चेंडू हवेत उंच उडाला आणि इशान झेलबाद झाला. यासह इशान व संजूने केलेली ४५ चेंडूत ९७ धावांची भागीदारी तुटली आहे. इशान १८ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत बाद झाला. यासह भारताने १० षटकांत २ बाद ११९ धावा केल्या आहेत.

19:43 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: भारताच्या १०० धावा पूर्ण

भारताने ८.३ षटकांत १०० धावांचा आकडा गाठला आहे. विश्वचषकात फलंदाजीने फारशी चमकदार कामगिरी न करू शकलेल्या टीम इंडियाने आज मात्र कमाल फलंदाजी केली आहे. संजू-इशानच्या जोडीने आळीपाळीने आक्रमक फटकेबाजी करत ९ षटकांत संघाला १ बाद ११२ धावांपर्यंत पोहोचवलं आहे.

19:37 (IST) 5 Mar 2026

Sanju Samson Fifty: संजू सॅमसनचं वादळी अर्धशतक

संजू सॅमसनने २६ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. टी-२० विश्वचषकातील हे संजूचं सलग दुसरं अर्धशतक आहे. लायम डॉसनच्या ८व्या षटकात षटकार खेचत त्याने अर्धशतक पूर्ण केलं. यासह ८ षटकांत भारताने १ विकेट गमावत ९२ धावा केल्या.

19:27 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: पॉवरप्ले

भारताने एक विकेट गमावत पॉवरप्ले आपल्या नावे केला आहे. अभिषेक शर्मा पुन्हा एकदा मोठा फटका मारत झेलबाद झाला. यानंतर संजू सॅमसन व इशान किशनने संघाचा डाव सावरला आणि ६ षटकांत संघाला १ बाद ६७ धावांपर्यंत नेलं आहे.

19:19 (IST) 5 Mar 2026
IND vs ENG Live: ५ षटकांत ५० धावा पूर्ण

अभिषेक बाद झाल्यानंतर आलेल्या इशान किशननेही संजूला चांगली साथ दिली आहे. यासह भारताने ५ षटकांपूर्वीच ५० धावांचा आकडा गाठला आहे. यासह संंजूने ३१ धावा तर इशान १५ धावा खेळत आहे. ५ षटकं पूर्ण झाल्यानंतर भारताने बिनबाद ५५ धावा केल्या आहेत.

19:13 (IST) 5 Mar 2026

IND vs ENG Live: हॅरी ब्रुकने सोडली कॅच

जोफ्रा आर्चर तिसऱ्या षटकात गोलंदाजीला आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर संजूने चौकार लगावला. यानंतर पुढचा चेंडूवर संजूने मारलेला चेंडू ब्रूकच्या जवळपास हातात गेला, पण त्याच्या हाताला लागून चेंडू बाजूला पडला आणि त्याने सामन्यातील मोठा झेल सोडला. यानंतर संजूने षटकार-चौकार मारत त्या षटकात १४ धावा कुटल्या.

Ind vs Eng, ICC Men’s T20 World Cup 2026 2nd Semi Final Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ मधील दुसरा सेमीफायनल सामना