इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या कसोटीत खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. पुढच्या महिन्यात या कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शुबमनची कामगिरी चांगली झाली नव्हती. अनेक क्रीडापंडितांनी शुबमनवर टीका केली होती.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, शुबमन दुखापतीमुळे सुरुवातीच्या कसोटीतून बाहेर पडला आहे. अद्याप त्याच्या दुखापतीच्या स्वरूपाविषयी काहीही स्पष्ट झालेले नाही. दुखापत झाली असली, तरी तो मायदेशी परतणार नाही. कसोटी मालिकेदरम्यान तो तंदुरुस्त होईल, असे वृत्त आहे.

 

इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अपयशी ठरल्यानंतर शुबमन गिलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सामन्यात अपयशी ठरल्यामुळे शुबमनला पहिल्या कसोटीत संघात स्थान मिळणे कठीण असल्याचे त्याने म्हटले होते. शुबमनबदली मयंक अग्रवाल किंवा केएल राहुल यांपैकी एकाला सलामीवीराची जागा मिळू शकते.

हेही वाचा – VIDEO : …आणि प्रेक्षकांसमोर ढसाढसा रडली सेरेना विल्यम्स!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना २० दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. १४ जुलै रोजी खेळाडू एकत्र येणार आहेत. यानंतर, इंट्रास्क्वॉड सामने खेळले जातील. ही पाच सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. २०१८मध्ये इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा १-४ असा पराभव झाला होता.