BCCI On Gautam Gambhir: भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वीच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वखाली खेळताना सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या जेतेपदाचा मान पटकावला. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ आयर्लंडचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला. या मालिकेत भारतीय संघाचा २-० ने लाजीरवाणा पराभव झाला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता भारतीय संघावर पुन्हा एकदा व्हॉइटवॉशचं संकट आहे. भारतीय संघाला गेल्या ६ पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. या सुमार कामगिरीनंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चौथ्या टी-२० सामन्यातील लाजीरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे ही मालिका झाल्यानंतर बीसीसीआय भारतीय खेळाडू आणि कोचिंग स्टाफमधील सदस्यांसोबत तातडीने बैठक घेणार आहे. या बैठकीत खेळाडूंचा आणि कोचिंग स्टाफमधील सदस्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे.

भारतीय संघाच्या फ्लॉप कामगिरीनंतर गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदावरही टांगती तलवार आहे. एएनआयच्या वृत्तात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीरचं मुख्य प्रशिक्षकपदही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण त्यानंतर झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा संघ सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा २०२७ पर्यंत आहे. त्याच्या ृ मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २ वेळा आयसीसीची ट्रॉफी जिंकली आहे. याआधी कुठल्याही मुख्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात भारताने २ वेळा आयसीसीची ट्रॉफी जिंकली नव्हती. पण गंभीरच्या कार्यकाळात भारतीय संघाला अनेक लाजीरवाण्या पराभवांचा सामना करावा लागला आहे. भारताने आजवर कधीच इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका गमावली नव्हती. पण हे गंभीरच्या कार्यकाळात पहिल्यांदाच घडलं. आता इंग्लंडचा संघ भारताचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे मालिका गमावलेल्या भारतीय संघासाठी शेवटचा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना शनिवारी द एजेसच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.