scorecardresearch

IND vs ENG T20 Series : इंग्लंडमध्ये ठरणार विराटचे भवितव्य! टी २० विश्वचषकात खेळण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

Virat Kohli T20 Future : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहली फॉर्ममध्ये नाही. आयपीएलमध्येही तो संघर्ष करताना दिसला.

Virat Kohli T20 Future
फोटो सौजन्य – ट्विटर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमावारीमध्ये सलग सहा वर्षे पहिल्या १० फलंदाजांमध्ये असलेला विराट कोहली काल पहिल्यांदाच १३व्या स्थानावर घसरला. एकदिवसीय आणि टी २० क्रमवारीमध्येदेखील कधीकाळी ‘बादशाह’ असलेला विराट सातत्याने खाली घसरताना दिसत आहे. आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडणारा विराट गेल्या काही काळापासून एक-एक धाव जमा करण्यासाठी झगडताना दिसत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकामध्ये त्याला संधी मिळणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. असे म्हटले जात आहे की, इंग्लंडविरुद्ध असलेल्या टी २० आणि एकदिवसीय मालिकांमधील कामगिरीवर त्याचे भवितव्य ठरणार आहे.

बुधवारी (६ जुलै) राष्ट्रीय निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्या, ऋषभ पंत हे देखील या संघात नाहीत. टी २० मालिकेसाठी रोहित, पंत आणि पंड्याला संघात घेतले जाईल, अशी शक्यता आहे. मात्र, विराट कोहलीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

हेही वाचा – Ind vs Eng 1st T20 : आजपासून रंगणार टी-२० मालिका; जाणून घ्या संभाव्य संघ आणि खेळपट्टी

टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीला मधल्या फळीत संधी देण्याबाबत गहण विचारात आहेत. टी २० विश्वचषक तोंडावर असताना विराट कोहलीचा खराब फॉर्म सर्वांच्या चिंतेचा विषय ठरला आहे.

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहली फॉर्ममध्ये नाही. आयपीएलमध्येही तो संघर्ष करताना दिसला. अशा स्थितीमध्ये मधल्या फळीची जबाबदारी तो निभावेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुर्यकुमार यादव, दीपक हुडा, आणि श्रेयस अय्यर यांच्या रूपात निवड समितीकडे काही पर्याय आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांमध्ये विराट कोहलीला स्वत:ला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. तिथे त्याने चमकदार कामगिरी केली तर त्याचा टी २० विश्वचषकाचा मार्ग सोपा होईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng t20 series according to reports virat kohli t20 future depends on england tour vkk

ताज्या बातम्या