Fans angry on Rajat Patidar and BCCI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना रांचीच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीच्या जागी संधी मिळालेला रजत पाटीदार आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, टीम इंडियाच्या व्यवस्थापनानेही त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता. त्याला कोहलीच्या आवडत्या फलंदाजीच्या क्रमांकावर म्हणजेच चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. परंतु या संधीचं सोनं करण्यात तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे चाहतेही प्रचंड नाराज झाले आहेत.

रजत पाटीदार पुन्हा अपयशी –

रजत पाटीदारने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. मात्र पदार्पण केल्यापासून आतापर्यंत त्याला सूर गवसलेला नाही. त्याने टीम इंडियासाठी तीन कसोटी सामन्यांच्या ५ डावात केवळ ६३ धावा केल्या आहेत. पदार्पणापासूनच त्याने ३२, ९, ५, ० आणि १७ धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १७ धावा केल्या. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीसारख्या खेळाडूंना संधी दिली जात नसल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर रजत पाटीदारवर निवड समिती मेहेरबान का? असेही विचारले जात आहे.

रजत पाटीदारवर निवड समिती मेहेरबान का?

कारण हनुमा विहारीला दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर पुन्हा संधीच दिली गेली नाही. त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी चांगली असूनही आतापर्यंत फक्त तीन कसोटीत संधी मिळाली आहे. त्याचबरोबर रणजी क्रिकेटमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराकडेही दुर्लक्ष केल्याने चाहते नाराज आहेत. यंदाच्या रणजी हंगामात पुजाराने ८ सामन्यात ८२९ धावा केल्या आहेत. यात ३ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पुजारा तिसऱ्या स्थानी आहे.

हेही वाचा – IND vs ENG : जुरेलच्या शानदार खेळीनंतर वीरेंद्र सेहवागने मीडियाकडे ‘ही’ मागणी केल्याने सर्फराझचे चाहते संतापले

सोशल मीडियावर चाहते संतापले –

रजत पाटीदारच्या सततच्या फ्लॉप शोमुळे सोशल मीडियावर चाहते संतापले आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘प्रिय बीसीसीआय, भारतासाठी रजत पाटीदार हा एकमेव पर्याय आहे का? हा भार किती दिवस उचलणार?’ दुसऱ्या चाहत्याने लिहिले आहे की, ‘मी रजत पाटीदारला चांगली कामगिरी करण्यासाठी पाठिंबा देत आहे. कारण तो एक शांत आणि संयोजित खेळाडू दिसतो, परंतु आता नाही. तो सतत बाद होत आहे. जेव्हा आम्ही छोट्या संघांविरुद्ध खेळतो तेव्हा कदाचित आम्ही त्याला आणखी एक संधी देऊ पण इंग्लंडविरुद्ध नाही.’ अजून एका चाहत्याने लिहिले, ‘फ्लॉप होऊनही रजत पाटीदारला का खेळवले जात आहे.’

हेही वाचा – IND vs ENG : पाचव्या कसोटीत भारताचा कर्णधार बदलणार? सुनील गावसकरांची रोहितकडे ‘या’ खेळाडूसाठी खास मागणी

स्टुअर्ट ब्रॉडचा पुजाराच्या अनुपस्थितीवर प्रश्न –

देशांतर्गत क्रिकेटमधील चेतेश्वर पुजाराची कामगिरी पाहता इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाजांनेही सोशल मीडियावर पुजाराच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्याचबरोबर धर्मशाला येथील पाचव्या सामन्यासाठी त्याची निवड करावी, असे देखील सुचवले. स्टुअर्ट ब्रॉडने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहले, अनुभवी आणि जागतिक दर्जाची प्रतिभा असलेला विराट कोहली नसताना, पुजाराला भारतीय संघात पुन्ही संधी दिला जाईल का? की त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली आहे? तो संघात काही सातत्य आणू शकेल असे दिसते.”