Sai Sudarshan: येत्या काही दिवसात भारतीय संघाची चांगलीच कसोटी लागणार आहे. भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर त्याचा गुजरात टायटन्स संघातील सलामीचा फलंदाज साई सुदर्शनला देखील पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र, तमिळनाडूचे क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना असं वाटत आहे की, साई सुदर्शनची फलंदाजी करण्याची टेक्निक ही इंग्लंडमधील आव्हानांना तोंड देण्यासाठी पुरेशी नाही.
सुलक्षण कुलकर्णी यांनी २०२३–२४ हंगामात तामिळनाडू संघाचे प्रमुख होते. त्यावेळी साई सुदर्शन देखील तामिळनाडू संघाचा भाग होता. त्यांच्या मते, साई सुदर्शनला हवेत स्विंग होणारे चेंडू खेळून काढण्याचं कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सुलक्षण कुलकर्णी म्हणाले, “ त्याचा देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. मी ज्यावेळी प्रशिक्षक होतो, त्यावेळी कमीत कमी दोन सामन्यांमध्ये त्याला सिमिंग ट्रॅकवर फलंदाजी करताना पाहिलं आहे. तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याला हवेत स्विंग होणाऱ्या चेंडू खेळण्याचं कौशल्य विकसित करण्याची गरज आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले, “ इंग्लंडमध्ये यशस्वी होण्याचं रहस्य म्हणजे, तुम्हाला चेंडू येण्याची वाट पाहावी लागते आणि मग तो खेळायचा असतो. त्यामुळे काही स्ट्रोक खेळणं टाळावं लागतं. त्याला शरीरापासून दूर जाणारे चेंडू खेळण्याची सवय आहे. दौरा सुरू होण्यापूर्वी त्याला या गोष्टीवर भर द्यावा लागेल.”
साई सुदर्शन इंग्लंडमध्ये खेळायला जाणार असल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये गेला आहे. त्याला २०२३ आणि २०२४ मध्ये सरे संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ३५ च्या सरासरीने धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक देखील झळकावलं. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २९ सामन्यांमध्ये ३९.९३ च्या सरासरीने १९५७ धावा केल्या आहेत.