Turning Point of India Win in IND vs ENG Semi Final: भारतीय संघाने इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये ७ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करत संघाचा विजय निश्चित केला. भारताच्या फलंदाजांनंतर भारताचे गोलंदाज या सामन्याचे हिरो ठरले. संजू सॅमसन ८९ धावांच्या खेळीसाठी सामनावीर ठरला. पण भारताचे गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या व शिवम दुबेसह सर्व गोलंदाजांचं या विजयात मोठं योगदान दिलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभारला. तर २० षटकांत इंग्लंडचा संघ २४६ धावा करू शकला.
जसप्रीत बुमराहने २ कमालीची षटकं टाकली आणि धावांवर अंकुश ठेवला. बुमराहच्या दोन षटकांमुळे इंग्लंडचे फलंदाज धावांच्या बाबतीत मागे ठरले. यानंतर हार्दिक पंड्याने १२ चेंडूत ३९ धावा असं समीकरण असताना सॅम करनला झेलबाद केलं आणि नंतर शिवम दुबेला अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी मिळाली. दुबेच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शतकवीर बेथल धावबाद झाला. यानंतर त्याने पुढचे दोन्ही चेंडू कमालीचे टाकले आणि मोठे फटके खेळू दिले नाही. पण अर्शदीपच्या षटकातील अक्षर पटेल व शिवम दुबेचा तो एक झेल टर्निंग पॉईंट ठरला.
अक्षर पटेल-शिवम दुबेचा तो झेल ठरला भारताच्या विजयाचा टर्निंग पॉईंट
१४व्या षटकात अर्शदीप सिंगला गोलंदाजीची संधी दिली. अर्शदीप गोलंदाजीला येण्यापूर्वी विल जॅक्स व जेकब बेथल दोघेही वादळी फटकेबाजी करत होते. दोघांनी ३९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी रचली होती. अर्शदीपच्या पहिल्या चेंडूवर बेथलने चौकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर त्याने २ धावा केल्या, तर तिसरा चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर २ धावा, पाचव्या चेंडूवर १ धाव घेतली. यानंतर अखेरच्या चेंडूसाठी अर्शदीपने ३ वाईड चेंडू टाकले. तीन प्रयत्नानंतर अर्शदीपने आपला खरा प्लॅन अंमलात आणला.
अर्शदीपने यानंतर चौथा चेंडू वाईड फुल टॉस टाकला आणि जॅक्सने बॅट स्ट्रेच करत मोठा फटका खेळला. सीमारेषेवर तिथे दुबे आणि अक्षर उपस्थित होते. जसा जॅक्सने फटका मारला, तिथून अक्षर पटेल चेंडूच्या दिशेने धावत आला आणि त्याने खाली वाकून चेंडू टिपला, चेंडू टिपल्यानंतर अक्षरचा तोल जात असल्याचं दिसत होतं आणि त्याने दोनदा सावरता सीमारेषा पाहिली आणि तिथे जवळ असलेल्या शिवम दुबेच्या दिशेने चेंडू फेकला आणि त्याने तो यशस्वीरित्या टिपला. तितक्यात अक्षर सीमारेषेबाहेर पडला. पण अक्षरने कमालीची प्रसंगावधानता दाखवत चेंडू वेळेत फेकला आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिला. अक्षर पटेल शिवम दुबेच्या या झेलसह भारताच्या या विजयात जसप्रीत बुमराहचं योगदानही महत्त्वाचं आहे. बुमराहने ४ षटकांत ३३ धावा देत १ विकेट मिळवली.
विल जॅक्स व जेकब बेथलची धोकादायक भागीदारी अर्शदीपने तोडली आणि ज्या कामासाठी त्याला बोलावलं होतं ते काम त्याने पूर्ण केलं. अर्शदीपच्या या षटकात विल जॅक्स बाद झाल्याने धावांवर काही वेळ ब्रेक लागला. त्यानंतर भारताच्या इतर गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला धावा करण्याची संधी दिली नाही. याशिवाय अखेरच्या षटकांमधील बुमराह, हार्दिक, शिवम दुबेची गोलंदाजी बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही. आता भारतीय संघ ८ मार्चला न्यूझीलंड संघाविरूद्ध अंतिम सामना खेळेल.
