U19 World Cup 2026 IND vs ENG Final Time: अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा आता अखेरच्या टप्प्यात पोहोचले आहेत. स्पर्धेतील दोन फायनलिस्ट संघ देखील मिळाले आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम सामना गाठला. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने विश्वविक्रम करत अफगाणिस्तानला पराभूत केलं आणि फायनलमध्ये धडक मारली. यासह भारत आणि इंग्लंडचे संघ अंतिम सामना खेळणार असून हा सामना किती वाजता सुरू होणार, जाणून घेऊया.

भारतीय अंडर-१९ संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा पराभव करून विक्रमी दहाव्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत सलग सहाव्यांदा जेतेपदाच्या सामन्यात खेळणार आहे, हा एक अनोखा विक्रम संघाने आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी सहा वेळा अंतिम फेरीत पोहोचून ही कामगिरी केली आहे, पण आता भारताने त्यांना मागे टाकलं आहे. याशिवाय यंदाच्या स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही.

दुसरीकडे, इंग्लंडने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. इंग्लंडचा संघही संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजी विभागाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात इंग्लंड भारतासमोर एक मोठे आव्हान उभे करू शकते.

भारत-इंग्लंड हेड टू हेड

दोन्ही संघांमधील १९ वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्यांचा रेकॉर्ड पाहता टीम इंडिया वरचढ राहिली आहे. भारत आणि इंग्लंड अंडर-१९ संघ आतापर्यंत ५५ वेळा एकमेकांसमोर आले आहेत, त्यापैकी ४१ सामने भारताने जिंकले आहेत. इंग्लंडने १३ सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. पण अंतिम सामन्यात आता कोणता संघ बाजी मारणार यावर सर्वांच्या नजरा असतील.

अंडर-१९ विश्वचषक फायनल किती वाजता सुरू होणार?

१९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना शुक्रवार, ६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळवला जाईल. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार दुपारी १.०० वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ही १२.३० वाजता होईल. इतर सर्व सामन्यांप्रमाणे हा सामनादेखील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ

भारतीय संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, डी. दीपेश, मोहम्मद इमान, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उदय मोहन, हेनिल पटेल, खिलन पटेल, हर्षवर्धन सिंग, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी

इंग्लंड संघ: थॉमस रीव्हज (कर्णधार), फरहान अहमद, रॉकी अलर्ट, बिल विसन, बेन डॉकिन्स, कॅलेब फॉकनर, अली फारूख, अ‍ॅलेक्स फ्रेंच, अ‍ॅलेक्स ग्रीन, ल्यूक हेंडरसन, मॅनी लार्डन, बेन मेयर, जेम्स मीटो, जो मूर्स, सेबॅस्टियन मॉर्गन