मागील वर्षी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. त्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा दौरा मध्येच सोडून खेळाडूंना मायदेशी परतावे लागले होते. या मालिकेतील राहिलेला एकमेव कसोटी सामना १ जुलैपासून खेळवला जाणार आहे. त्यासाठी भारतीय कसोटी संघातील काही प्रमुख खेळाडू लंडनला पोहोचले आहेत. दरम्यान, रोहित आणि विराटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये हे दोघेही लंडनमध्ये खरेदी करताना दिसत आहेत.

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासह इतर खेळाडू १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटीसाठी तयारी करत आहे. विराट कोहली इतर खेळाडूंना घेऊन गुरुवारी (१६ जून) लंडनला रवाना झाला होता तर, रोहित शर्मा एका दिवसानंतर तिथे पोहचला होता. हे दोघे वेगवेगळ्या दिवशी लंडनला गेल्याने दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

अशातच ‘क्रिकेटमॅन२’ या ट्विटर अकाउंटवर विराट कोहली आणि रोहित शर्माचे दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये दोघेही एकाच चाहत्यासोबत दिसत आहेत. शिवाय, दोघांच्याही हातात खरेदीच्या पिशव्या दिसत आहेत. रोहित आणि विराटने लंडनमध्ये एकत्र खरेदी सुरू केल्याचे या फोटोंवरून स्पष्ट होत आहे. गंमत म्हणेज आयपीएलनंतर रोहित शर्मा पत्नी आणि मुलीसोबत मालदीवला गेला होता. त्यानंतर काही दिवसातच विराट कोहलीसुद्धा पत्नी आणि मुलीसोबत मालदीवला गेल्याचे, सोशल मीडिया पोस्टवरून समोर आले होते.

हेही वाचा – IND vs SA T20 Series: घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकून ‘पंतसेना’ इतिहास रचणार का?

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ २४ जून ते २७ जून या कालावधीत लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर १ जुलैपासून कसोटी सामना होईल. कसोटीनंतर ७ जुलैपासून तीन टी २० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. तर, १२ जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल.

दरम्यान, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी २० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे या मालिकेत नव्हते. मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर लंडनला रवाना होतील.