IND vs ENG: मैदानात मोहम्मद सिराजला बॉल फेकून मारल्याने विराट कोहली संतापला

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजला इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून टार्गेट करण्यात आलं

Virat Kohli, Mohammed Siraj, IND vs ENG
भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजला इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून टार्गेट करण्यात आलं

लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत जबरदस्त विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंड संघापुढे सपशेल लोटांगण घातले. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आघाडीच्या फळीला निष्प्रभ केल्यानंतर अन्य तीन तिघांनी भेदक मारा करीत भारताचा पहिला डाव फक्त ७८ धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी दिवसअखेर बिनबाद १२० धावांपर्यंत पहिल्या डावात मजल मारून ४२ धावांची आघाडी घेतली. दरम्यान यावेळी मैदानात घडलेल्या एका प्रकारामुळे कर्णधार विराट कोहली संतापला.

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजला इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून टार्गेट करण्यात आलं. काही प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजला प्लास्टिक बॉल फेकून मारला. यामुळे विराट कोहली नाराज झाला होता. यानंतर विराटने मोहम्मद सिराजला तो बॉल मैदानाबाहेर फेकून देण्यास सांगितलं.
ऋषभ पंतने यासंबंधी बोलताना सांगितलं की, “मला वाटतं कोणीतरी मोहम्मद सिराजच्या दिशेने बॉल फेकला. आणि हो त्यामुळे विराट कोहली नाराज होता”. पुढे त्याने म्हटलं की, “तुम्हाला काय हवं असेल ते तुम्ही बोलू शकता, पण अशा पद्धतीने खेळाडूंना वस्तू फेकून मारु नका. हे क्रिकेटसाठी योग्य नाही”.

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : लीड्सवर लोटांगण!

२७ वर्षीय सिराजने दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयात मोलाची कामगिरी निभावली होती. याआधीही त्याला अशा पद्धतीने प्रक्षेकांकडून टार्गेट करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी नाव घेऊन आक्षेपार्ह भाषा वापरली होती. यानंतर खेळ थांबवत प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. मोहम्मद सिराजने त्यावेळी पंचांकडे यासंबंधी तक्रार केल्याने त्या प्रेक्षकांविरोधात कारवाई करण्यात आली होती. दरम्यान भारताकडून अद्याप अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पहिल्याच दिवशी भारतीय संघ ढेपाळला

नाणेफेक जिंकल्यावर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सलामीवीर रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) वगळता एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाही. भारताकडून सर्वाधिक ३५ धावांची भागीदारी मुंबईकर रोहित-रहाणे या जोडीने चौथ्या गड्यासाठी केली. रोहितने संयमी भूमिका घेत १७२ मिनिटे आणि १०५ चेंडू किल्ला लढवला.

३९ वर्षीय अँडरसनने आघाडीच्या तीन फलंदाजांना झटपट तंबूची वाट दाखवल्यामुळे उपाहाराप्रसंगी भारताची ४ बाद ५६ अशी अवस्था झाली होती. अँडरसनच्या गोलंदाजीचे ८-५-६-३ असे भेदक पृथक्करण होते. के. एल. राहुल (०), चेतेश्वर पुजारा (१) आणि विराट कोहली (७) या महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने यष्टीरक्षक जोस बटलरद्वारे झेलबाद केले. रहाणे स्थिरावतो असे वाटत असतानाच रॉबिन्सनने उजव्या यष्टीबाहेरील चेंडूवर त्याला बटलरद्वारे झेलबाद केले.

मग दुसऱ्या सत्रात १२ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात भारताचे उर्वरित सहा फलंदाज तंबूत परतले. उपाहारानंतर रॉबिन्सनने ऋषभ पंतचा (२) अडसर दूर केला, तर ओव्हर्टनने रोहितला बाद करण्याची किमया साधली. ओव्हर्टनने पुढच्याच चेंडूवर लॉर्ड्सवर झुंजार फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीला भोपळाही फोडू दिला नाही. पुढच्या षटकात करनने रवींद्र जडेजा (४) आणि जसप्रित बुमरा (०) यांना पायचीत केले. इशांत शर्मा (नाबाद ८) आणि मोहम्मद सिराज (३) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण ओव्हर्टनने सिराजला बाद करून भारतीय धावसंख्येपुढे पूर्णविराम दिला.

त्यानंतर, उर्वरित अर्ध्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या सलामीवीरांनी वर्चस्व गाजवत नाबाद अर्धशतके झळकावली. लॉर्ड्सवर पराक्रम दाखवणारी भारताची वेगवान चौकडी बळी मिळवण्यासाठी झगडताना आढळली. त्यामुळे इंग्लंडचा संघ गुरुवारी पहिल्या डावात कितपत मजल मारेल, याची उत्सुकता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs eng virat kohli upset after ball thrown at mohammed siraj by headingley crowd leaves skipper sgy

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या