आशिया चषक स्पर्धेत भारताने हाँगकाँग संघाला ४० धावांनी पराभूत केलं. या सामन्यात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. दोघांनीही चौकार, षटकार लगावत नाबाद अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही भारताने चांगला खेळ केला. या सामन्यात रवींद्र जडेजाने मारलेला ‘डायरेक्ट हीट’ तर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. रवींद्रचा थ्रो पाहून विराट कोहलीनेदेखील खास रिअॅक्शन दिली.

हेही वाचा >> अखेर दुष्काळ संपला! विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस, झळकावले दमदार अर्धशतक

हाँगकाँगच्या ५१ धावा झालेल्या असताना निझाकत खान आणि बाबर हयात ही जोडी फलंदाजी करत होती. सलामीचा यासीम स्वस्तात बाद झाल्यानंतर निझाकत खानने मोठे फटके मारण्या प्रयत्न केला. धांवाचा मोठा डोंगर पार करायचा असल्यामुळे या जोडीने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाच्या ५१ धावा झालेल्या असताना रवींद्र जडेजाने निझाकतला थेट धावबाद केलं.

जडेजा चेंडूला पकडून स्टंप्सना ‘डायरेक्ट हीट’ करेल, असे कोणालाही वाटले नाही. मात्र काही समजायच्या आतच जडेजाने अगदी सहजपणे चेंडू स्टंप्सवर फेकून मारला. परिणामी निझाकत खान अवघ्या १० धावांवर धावबाद झाला. जडेजाने मारलेला डायरेक्ट हीट पाहून विराट कोहलीदेखील काही क्षणासाठी चकित झाला. विशेष म्हणजे जडेजाने स्टंप्सला चेंडू फेकून मारल्यानंतर विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली. हाताने इशारे करत रवींद्र जडेजा गोट्या खेळतोय, असे विराट म्हणाला.

हेही वाचा >> अफगाणिस्तानच्या आगामी सामन्याआधी उमर गुलच्या पत्नीने केली खास विनंती, म्हणाली “पाकिस्तानविरोधात…”

दरम्यान, हाँगकाँगच्या संघाला वीस षटकांमध्ये १५२ धावा करता आल्या. त्यांना भारताने दिलेल्या १९३ धावाचे लक्ष्य गाठण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. शेवटी त्यांनी १५२ धावांची समाधानकारक खेळी केली. यामध्ये बाबर हयातने ४१ धावा केल्या. तर किनचित शाहनेही ३० धावा केल्या.