India vs Ireland 2nd T20I: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांची टी-२० मालिका सध्या अत्यंत रोमांचक वळणावर आहे. पहिल्या सामन्यात यजमान आयर्लंडने भारतीय संघाचा ३४ धावांनी पराभव करून मोठा अपसेट घडवून आणला. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडने भारताला पराभवाचा धक्का दिला. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाची सुरूवातही या पराभवामुळे खराब झाली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारत कदाचित मालिका जिंकू शकणार नाही, परंतु पुढील सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत नक्कीच संपवू शकतो. आता हा दुसरा सामना कधी, कुठे व केव्हा होणार, जाणून घेऊया.
‘करा किंवा मरा’ अशा या सामन्यात, १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. त्याला पहिल्याच सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी चर्चा होती. पण पहिल्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. शिवाय भारताने कमकुवत फलंदाजीमुळे तो सामना गमावला. यानंतर आता वैभवला दुसऱ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
मालिका गमावण्याचे संकट टाळण्यासाठी टीम इंडियावर प्रचंड दडपण असतानाच, सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या आहेत. विशेष म्हणजे, दडपण असलेल्या आणि ‘नॉकआउट’ सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडण्यात वैभवचा हातखंडा आहे. जेव्हा संघासमोर विजयाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही, तेव्हा या युवा खेळाडूची बॅट खऱ्या अर्थाने तळपते. यावर्षी त्याने महत्त्वाच्या प्रसंगी पाच नॉकआउट सामने खेळले आहेत आणि प्रत्येक वेळी त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजीचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे.
वैभव सूर्यवंशीची नॉकआऊट सामन्यातील कामगिरी
१९-वर्षांखालील विश्वचषक २०२६ उपांत्य सामना: अफगाणिस्तानविरुद्धच्या अत्यंत तणावपूर्ण सामन्यात, वैभव सूर्यवंशीने केवळ ३३ चेंडूंत ६८ धावांची (९ चौकार आणि ४ षटकारांसह) धडाकेबाज खेळी केली होती.
१९-वर्षांखालील विश्वचषक २०२६ अंतिम सामना: अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली; केवळ ८० चेंडूंत १७५ धावांची (१५ चौकार आणि १५ षटकारांसह) तुफानी खेळी साकारली होती.
IPL 2026 एलिमिनेटर: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या ‘करो या मरो’ अशा सामन्यात त्याने अवघ्या २९ चेंडूंत ९७ धावांची (५ चौकार आणि १२ षटकारांसह) धडाकेबाज खेळी केली होती.
आयपीएल २०२६ क्वालिफायर २: गुजरात टायटन्सविरुद्धच्या आणखी एका बाद फेरीच्या सामन्यात ९६ धावांची शानदार खेळी (४७ चेंडूंत ८ चौकार आणि ७ षटकारांसह) साकारली.
एकदिवसीय तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात, ‘श्रीलंका अ’ (Sri Lanka A) विरुद्धच्या लढतीत त्याने पुन्हा एकदा गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने केवळ २९ चेंडूंमध्ये ९४ धावांची (यात १० चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता) धडाकेबाज खेळी करत ‘भारत अ’ (India A) संघाला ६६ धावांनी विजय आणि विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
भारत आणि आयर्लंड टी-२० मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना आता २८ जून रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना बेलफास्टमध्ये खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता होईल. या सामन्यात विजय मिळवत भारताला ही टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्याची मोठी संधी आहे. हे सामने सोनी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर व सोनी लिव्ह अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहेत.
