India vs Ireland T20 Series : भारतीय संघाचा आयर्लंडला व्हाईट वॉश; हार्दिकच्या नेतृत्वाखाली जिंकली मालिका

India vs Ireland : भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धची टी २० मालिका २-० अशी जिंकली आहे.

IND vs IRE T20 series
फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्वीटर

IND vs IRE Result : भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसरा सामना डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) खेळवण्यात आला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना भारताने चार धावांनी जिंकला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे. शतकवीर दीपक हुडा आणि अर्धशतकी खेळी केलेला संजू सॅमसन हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दीपक हुड्डाचे धडाकेबाज शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने २० षटकांमध्ये सात गडी गमावून २२७ धावा केल्या. दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी विक्रमी १७६ धावांची भागीदारी केली. या दरम्यान दीपकने ५७ चेंडूत १०४ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकार फटकावले. तर, संजू सॅमसनने ४२ चेंडूत ७७ धावा केल्या.

दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत रोहित शर्माच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी केएल राहुल, रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी शतके झळकावली आहेत.

भारताने दिलेले २२८ धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या आयर्लंडने शेवटपर्यंत जोरादार टक्कर दिली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि कर्णधार अँड्रयू बालबर्नी यांनी संघाला आश्वासक सुरुवात मिळवून दिली. मात्र, स्टर्लिंग ४० धावा करून बाद झाल्याने ही जोडी फुटली. त्यानंतर आलेला गॅरेथ डेलानी शून्यावर माघारी परतला. यादरम्यान, कर्णधार अँड्रयूने आपले अर्धशतक पूर्ण केले. हॅरी टेक्टरने २८ चेंडूत ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून भारतीय संघाची चिंता वाढवली. शेवटी मैदानावर असलेल्या जॉर्ज डॉकरेल आणि मार्क अडायर या जोडीने शानदार फटकेबाजी करत सामना रंगतदार स्थितीमध्ये आणून ठेवला.

हेही वाचा – India vs Ireland : दीपक हुडाचे धडाकेबाज शतक; रोहित शर्मा, केएल राहुल अन् रैनाच्या क्लबमध्ये केला प्रवेश

शेवटचे षटक टाकण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्याने आपला दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या उमरान मलिकवर विश्वास दाखवला. आपल्या वेगवान माऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उमरानने कर्णधाराचा विश्वास सार्थ करून दाखवत संघाला विजय मिळवून देण्यात मदत केली. भारताने दोन सामन्यांची मालिका २-०ने जिंकली. भारताचा हा या वर्षातील सलग पाचवा व्हाईट वॉश ठरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs ire india beat ireland by 4 runs and won the t20 series vkk

Next Story
जिंकली ती मुंबईची ‘खडूस’ वृत्ती!; रणजी करंडक विजेत्या मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची भावना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी