India vs Ireland 2026 Full Schedule & Details in Marathi: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-२० मालिका येत्या २६ जूनपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघांचं नेतृत्व नवीन कर्णधार करणार आहेत; भारताचं नेतृत्व आता सूर्यकुमार यादवनंतर श्रेयस अय्यर करणार आहे, तर आयर्लंडने आपला माजी टी-२० उपकर्णधार लॉर्कन टकर याची नवीन टी-२० कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान या मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार, जाणून घ्या.

भारतीय संघ आयर्लंड मालिकेसाठी आयर्लंडमध्ये दाखल झाला असून संघाने सरावाला सुरूवात केली आहे. भारतीय संघात या मालिकेसाठी तीन बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे हार्दिक पंड्या व नितीश कुमार रेड्डी हे संघाबाहेर झाले, त्यानंतर नितीश रेड्डीच्या जागी सूर्यांश शेडगेचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर वरूण चक्रवर्ती दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. तर वैभव सूर्यवंशीला या मालिकेत पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारत-आयर्लंड टी-२० मालिकेला कधीपासून सुरूवात होणार?

भारत-आयर्लंड टी-२० मालिका २६ जून रोजी सुरू होऊन २८ जून अखेरचा सामना खेळवला जाईल. ही दोन सामन्यांची मालिका तीन दिवसांच्या कालावधीत खेळवली जाईल. पहिला टी-२० सामना २६ जून रोजी बेलफास्टमधये होईल, तर दुसरा सामनाही २८ जून रोजी बेलफास्टमध्येच खेळवला जाईल. आयर्लंड दौऱ्यावरील हे टी-२० सामने भारतीय वेळेनुसार नेहमीपेक्षा एक तास आधी सुरू होतील; भारतात टी-२० सामने साधारणपणे संध्याकाळी ७ वाजता सुरू होतात, मात्र आयर्लंडमधील हे सामने संध्याकाळी ६ वाजता सुरू होतील.

भारत आयर्लंड मालिकेतील सोनी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहेत. तर सोनी लिव्ह अॅपवर या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. आयर्लंडविरुद्धचा T20 सामना जगात कुठेही झाला तरी, भारतीय संघाने नेहमीच वर्चस्व राखलं आहे. आयर्लंडविरुद्ध भारताची विजयाची टक्केवारी १००% आहे. भारताने आतापर्यंत आयर्लंडविरुद्ध आठ टी-२० सामने खेळले आहेत आणि त्या सर्व सामन्यांत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, यापैकी सहा सामने आयर्लंडच्या भूमीवर खेळले गेले होते आणि तिथेही भारताने आपले वर्चस्व कायम राखलं आहे.

IRE vs IND T20 मालिकेसाठी भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, प्रिन्स यादव आणि वैभव सूर्यवंशी.

IRE vs IND T20 मालिकेसाठी आयर्लंडचा संघ

लॉर्कन टकर (कप्तान), रॉस एडेयर, बेन काल्टिज, गैरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहनी, मैथ्यू हंप्रीज, गेविन हॉय, मैथ्यू होलार्ड, लियम मैकार्थी, जय मूंद्रा, हैरी टैक्टर, टिम टैक्टर, रियूबेन विल्सन.