IND vs NED T20 WC 2026 Match: टी-२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यांतर भारतीय संघ आता त्याच्या पुढील मोहिमेसाठी सज्ज आहे. पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने सुपर-८मध्ये धडक मारली आहे. तत्त्पूर्वी टीम इंडियाला गट टप्प्यातील अखेरचा सामना नेदरलँड्सविरूद्ध खेळायचा आहे. अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात, टीम इंडिया अपराजित राहण्याचं लक्ष्य ठेवेल.
टीम इंडियाने आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. भारताने सलग तीन विजयांसह ६ गुण मिळवत सुपर-८ फेरीसाठी पात्रता मिळवली. त्यामुळे नेदरलँड्सविरूद्ध अखेरचा सामना ही एक औपचारिकता असेल, परंतु विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतो.
भारत-नेदरलँड्स सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना बुधवार, १८ फेब्रुवारीला खेळवला जाईल. टीम इंडियाला नेदरलँड्सकडून कडवी झुंज मिळू शकते. नेदरलँड्सने यापूर्वी पाकिस्तानला आव्हान दिलं होतं परंतु शेवटच्या षटकात त्यांचा पराभव झाला. तर अमेरिकेने देखील भारताविरूद्ध अटीतटीची लढत दिली होती. त्यामुळे कोणत्याच संघाला साधारण समजून चालणार नाही.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यात चाहत्यांचा मोठा पाठिंबा भारताला मिळणार आहे. जवळपास भारतातील सर्वच संघांच्या टी-२० वर्ल्डकप सामन्यांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. भारत-नेदरलँड्स सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर भारतीय संघ आता गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात. कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्याचा वापर त्याच्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्यासाठी किंवा खेळाडूंना लयीत ठेवण्यासाठी करू शकतो. असे काही खेळाडू संघात आहेत,ज्यांना अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यांना नेदरलँड्सविरूद्ध सामना खेळण्याची संधी मिळू शकते.
भारताचा टी-२० वर्ल्डकपसाठी संपूर्ण संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक).
भारत-नेदरलँड्स सामन्याचे डिटेल्स (IND vs NED)
सामना: भारत विरुद्ध नेदरलँड्स (ग्रुप अ, सामना ३६) तारीख: बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६
वेळ: संध्याकाळी ७:००
ठिकाण: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
