भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या आहारात कथित हलाल मांसचा समावेश करण्यावरून वाद सुरू झाला आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार, खेळाडूंना कोणत्याही प्रकारे पोर्क आणि बीफ खाण्याची परवानगी नाही. जर कोणाला मांस खायचे असेल तर ते फक्त हलाल मांस खाऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरवर या नव्या डाएट प्लॅनमुळे नवा वाद सुरु झाला आहे. या संपूर्ण वादावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

खेळाडूंच्या जेवणावर कोणतेही बंधन नाही आणि खेळाडूंना जे खायचे आहे ते निवडण्याचे त्यांना स्वतंत्र आहे अशी प्रतिक्रिया अरुण धुमाळ यांनी दिली आहे. इंडिया टुडेशी बोलताना धुमाळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  “खेळाडूंसोबत जेवणाबाबत कधीही चर्चा झालेली नाही आणि अशा डाएट प्लॅनबद्दल कधीच ऐकले नाही. हा निर्णय कधी घेतला हे मला माहीत नाही. माझ्या माहितीनुसार, आम्ही कधीही आहार योजनेबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. जोपर्यंत खाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठी खेळाडूंना वैयक्तिक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात बीसीसीआयची कोणतीही भूमिका नाही, असे अरुण धुमाळ यांनी म्हटले आहे.

“ही  गोष्ट कधीतरी कोणत्या खेळाडूच्या फीडबॅकवर झाली असेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या खेळाडूने सांगितले की तो गोमांस खात नाही आणि जर परदेशी संघ आला तर जेवणात ते एकत्र ठेवू नये,” असे धुमाळ म्हणाले.

या विषयावर अधिक माहिती देताना धुमाळ म्हणाले की बीसीसीआय आपल्या खेळाडूंना त्यांच्या आहारातील प्राधान्ये काय असावीत याची शिफारस करत नाही. त्यांना कोणते अन्न खायचे आहे, हे खरे तर नेहमीच त्या व्यक्तीची निवड असते, मग ते मांसाहारी असो की शाकाहारी.

“बीसीसीआय आपल्या कोणत्याही खेळाडूला काय खावे आणि काय खाऊ नये याचा सल्ला देत नाही. खेळाडू स्वतःचे अन्न निवडण्यास स्वतंत्र आहेत. त्यांना शाकाहारी खायचे आहे की नाही, ही त्यांची निवड आहे,” असे धुमाळ यांनी स्पष्ट केले.

या वादानंतर भाजपाचे प्रवक्ते गौरव गोयल यांनी ही शिफारस तात्काळ मागे घेण्याची मागणी बीसीसीआयकडे केली होती. त्याच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी, “खेळाडूंनी त्यांना हवे ते खावे. ही त्यांची निवड आहे. पण ‘हलाल’ मांसाची शिफारस करण्याचा अधिकार बीसीसीआयला कोणी दिला आहे. हा निर्णय योग्य नाही. तो त्वरित मागे घेण्यात यावा, असे म्हटले आहे.

हलाल मांस म्हणजे काय?

हिंदू आणि शीख लोक झटका मांस खातात तर मुस्लिम समाजातील लोक हलाल मांस खातात. हलाल मांस म्हणजे प्राण्याच्या गळ्याची नस कापून सगळं रक्त निघून जाण्यापर्यंत सोडून दिले जाते. तर झटका प्रकारामध्ये धारदार हत्याराने प्राण्याचे शीर धडावेगळे केले जाते आणि त्याचे मांस केले जाते.