भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी कोलकाता पोलिसांनी मैदानाजवळून ११ जणांना अटक केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले, की हे सर्वजण मॅचची तिकिटे बेकायदेशीर पद्धतीने विकत होते. त्यांच्याकडे एकूण ६० तिकिटे होती, जी मूळ किमतीपेक्षा जास्त दराने विकली जात होती.

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानाभोवती सुमारे २००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता पोलीस, आरएएफ, एचआरएफएसच्या जवानांचा समावेश आहे.

हेही वाचा – SEXTING Scandal : टिम पेनची साडेसाती सुरूच..! त्याच्या भावोजींवरही लागला घाणेरडा आरोप; ‘त्याच’ महिलेला…

पोलिसांनीही बहुतांश जवान साध्या गणवेशात तैनात केले आहेत, जेणेकरून सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देता येईल आणि त्यावर लक्ष ठेवता येईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने जयपूर आणि रांची येथे खेळलेले पहिले दोन सामने जिंकले आहेत. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, यजुर्वेंद्र चहल.

न्यूझीलंड : मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट ( यष्टीरक्षक ), जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार) , अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट.