Abhishek Sharma Breaks Yuvraj Singh Record: वनडे मालिकेनंतर आता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील ५ टी- २० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने दमदार सुरूवात करून दिली. त्याने ३५ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने ८४ धावांची दमदार खेळी केली. त्याचं शतक अवघ्या १६ धावांनी हुकलं. दरम्यान २ षटकार मारताच त्याने आपला गुरू युवराज सिंगचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

अभिषेक शर्मा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. टी-२० संघात डावाची सुरूवात करण्यासाठी येणारा अभिषेक शर्मा पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतो. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी त्याच्या नावे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७३ षटक मारण्याची नोंद होती. या डावात फलंदाजी करताना २ षटकार मारताच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात युवराज सिंगला मागे टाकलं आहे. युवराज सिंगच्या नावे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७४ षटकार मारण्याची नोंद आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावे आहे. रोहित शर्माने आपल्या टी-२० कारकिर्दीदरम्यान २०५ षटकार खेचले होते. तर टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावे १५५ षटकार मारण्याची नोंद आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या नावे १२४ षटकार मारण्याची नोंद आहे. तर चौथ्या स्थानी असलेल्या हार्दिक पंड्याच्या नावे १०६ षटकार मारण्याची नोंद आहे. केएल राहुलने टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी ९९ षटकार मारले आहेत. आता अभिषेक शर्मा या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ८१ षटकार मारले आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

रोहित शर्मा- २०५ षटकार
सूर्यकुमार यादव- १५५ षटकार
विराट कोहली- १२४ षटकार
हार्दिक पंड्या- १०६ षटकार
केएल राहुल- ९९ षटकार
अभिषेक शर्मा- ८१ षटकार
युवराज सिंग- ७४ षटकार