India vs New Zealand 1st T20I: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने सुरूवातीला आणि शेवटी रिंकू सिंगने दमदार फलंदाजी करून २३८ धावांचा डोंगर उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. या धावांचा पाठलाग करताना ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन यांनी पूर्ण जोर लावला. पण शेवटी भारतीय संघाने हा सामना ४८ धावांनी जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. डेव्हॉन कॉन्वे शून्यावर माघारी परतला. त्यानंतर रचिन रवींद्रनेही १ धाव करून पॅव्हेलियनची वाट धरली. सलामीला आलेल्या टीम रॉबिन्सनने १५ चेंडूत २१ धावा करून संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील बाद होऊन माघारी परतला.
त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमनने तुफान फटकेबाजी करून न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करून दिलं. ग्लेन फिलिप्सने ४० चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकार खेचले. तर चॅपमनने २४ चेंडूत ३९ धावा केल्या. ही जोडी मैदानावर होती, तोपर्यंत न्यूझीलंडचा संघ सामन्यात टिकून होता, पण ही जोडी फुटल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरील पकड मजबूत केली.
भारतीय संघाने उभारला २३८ धावांचा डोंगर
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरूवातीलाच २ मोठे धक्के बसले. संजू सॅमसन आणि इशान किशन दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर अभिषेक शर्माने तुफान फटकेबाजी करून भारतीय संघाचा डाव सांभाळला. अभिषेक शर्माने ३५ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने ८४ धावांची दमदार खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने १६ चेंडूत २५ धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने तडाखेबंद फलंदाजी केली. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने २० चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी बाद २३८ धावांचा डोंगर उभारला.
