वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय फलंदाजांना चांगलच जेरीस आणलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा केन विल्यमसनचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र भारताचा दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.

भारताचे ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर मयांक आणि अजिंक्य रहाणे जोडीने नेटाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना केला. दोन्ही खेळाडूंनी पहिलं सत्र खेळून काढत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. यादरम्यान १९९० नंतर मयांक अग्रवाल न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात पहिलं सत्र खेळून काढणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी १९९० साली नेपियर कसोटीत मनोज प्रभाकर यांनी पहिलं सत्र खेळून काढलं होतं.

मात्र उपहारानंतरच्या सत्रानंतर मयांक अग्रवाल लगेच माघारी परतला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या जेमिसनने मयांकचा झेल घेतला. मयांकने ८४ चेंडूत ५ चौकारांसह ३४ धावा केल्या.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कर्णधार म्हणून विराट पहिल्याच कसोटीत अपयशी