भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा टी-२० सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून कर्णघार हार्दिक पांड्या १५ आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव २६ धावांवार नाबाद राहिले.
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ बाद ९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी १०० धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.५ षटकांत ४ गडी गमावून १०१ धावा करत विजय मिळवला.
न्यूझीलंड संघाकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २३ चेंडूत नाबााद १९ धावा केल्या. इतर किवी फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. त्याचबरोबर शिवम मावी वगळता प्रत्येक गोलंदाजांने प्रत्येकी १ विकेट घेतली.
१०० धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला शुबमन गिलच्या रुपाने पहिला धक्का बसला. शुबमन गिल ११(९) धावा करुन झेलबाद झाला. त्याच्यानंतर इशान किशन देखील ३२ चेंडूत १९ आणि राहुल त्रिपाठी १३ बाद झाले. त्यानंतर कर्णधार आणि उपकर्णधाराने पाचव्या गड्यासाठी नाबाद ३१ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधता आली. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना एम ब्रेसवेल आणि मार्क चॅपमनने प्रत्येकी एक विकेट घेतली.