scorecardresearch

IND vs NZ 3rd T20I: अहमदाबादमध्ये शुबमन गिलचे वादळ! शतकांची मालिका सुरुच, न्यूझीलंडला फोडला घाम

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलने शानदार शतक झळकावत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.

IND vs NZ 3rd T20I: In the third T20 match against New Zealand, India's star batsman Shubman Gill scored a brilliant century and brought the Indian team to a strong position
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी२० मालिकेतील तिसरा सामना खेळवला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने उभे राहिले आहेत. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिका जिंकण्याकडे भारताचे लक्ष असेल. रांचीमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्याचवेळी टीम इंडियाने लखनऊमध्ये खेळवण्यात आलेला दुसरा टी२० सामना जिंकला.

भारताला सामन्यात पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. दुसऱ्या चेंडूवर मायकल ब्रेसवेलने सलामीवीर इशान किशनला पायचीत केले. किशनने तीन चेंडूत केवळ एक धाव घेतली. मात्र त्याच्यासोबत उतरलेला भारताचा दुसरा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अक्षरश: पिसे काढली. अवघ्या ५४ चेंडूत त्याने आपले शतक साजरे केले. या तुफानी खेळीत तब्बल १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. शुबमन गिलने १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. शुबमनने शतक साजरे करताच कर्णधार हार्दिकने त्याचे अभिनंदन केले तर डगआऊट मधून प्रशिक्षक राहुल द्रविड तसेच इतर संघ सहकाऱ्यानी देखील त्याचे अभिनंदन केले. तिन्ही फॉरमॅट मध्ये शतक करणारा शुबमन पाचवा खेळाडू ठरला आहे. ६३ चेंडूत १२६ धावा करत शुबमन गिल अखेर नाबाद राहिला.

शुबमन गिल भारतीय संघाकडून टी२० मध्ये (१२६ नाबाद) सर्वोत्तम धावसंख्या करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्माने ११८ तर विराट कोहलीने १२२ धावा केल्या होत्या. या शतकाला त्याने १२ चौकारांचा तर ७ षटकारांचा साज चढवला. या तुफानी शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २३४ धावांचा पल्ला गाठत न्यूझीलंडसमोर मालिका विजयासाठी डोंगराएवढे आव्हान ठेवले आहे. याआधी कधीही किवींनी २०० धावांच्यावर पाठलाग केलेला नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवरील टी२० मधील सर्वोच्च धावसंख्या भारताने नोंदवली आहे.

हेही वाचा: IND vs NZ 3rd T20I: ‘राव अस कुठ असत होय’! बॅट की पॅड? इशान किशनची विकेट वादाच्या भोवऱ्यात, चाहते भडकले

आजच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण, पृथ्वी शॉ याला तिन्ही सामन्यात बाकावरच बसवून ठेवले गेले. फिरकीपटू युझवेंद्र चहल याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करत उमरान मलिकला संधी दिली गेली. मागील सामन्यात युजवेंद्रने भारताकडून टी२०त सर्वाधिक विकेट्सचा विक्रम नावावर केला होता आणि आज त्याला बाहेर केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकदिवसीय मधील दोन द्विशतकवीर इशान किशन आणि शुबमन गिल टी२० मध्ये सतत फ्लॉप होत होते. यानंतरही संघ व्यवस्थापनाने त्याला पुन्हा एकदा सलामीच्या फलंदाजीसाठी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र किशनला त्याचा फायदा उठवता आला नाही. शुबमनने पुरेपूर फायदा घेत शतकांची मालिका सुरूच ठेवली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 20:36 IST