Gautam Gambhir Statement On Vaibhav Sooryavanshi: भारत आणि न्यूझीलंड टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळणार का? इशान किशन दुखापतीमुळे २ सामने बाहेर गेल्यानंतर वैभवला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. पण तो परतल्यानंतर वैभवला पुन्हा एकदा प्लेईंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आलं. दरम्यान मालिकेतील पाचवा टी-२० सामना सुरू होण्याआधी भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीरने मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात २ बदल करण्यात आले. भुवनेश्वर कुमार आणि वरूण चक्रवर्तीला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं. तर वैभव सूर्यवंशी पुन्हा बाकावरच राहिला. वैभवला संधी मिळत नसल्याने सोशल मीडियावर गौतम गंभीरवर जोरदार टीका केली जात आहे. आता गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीच्या नावाचा उल्लेख न करता टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सामना सुरू होण्यापूर्वी बोलतान गौतम गंभीर म्हणाला की, “माजे काम प्रत्येकाला खूश करणे नाही. माझी जबाबदारी ही योग्य निर्णय घेणं ही आहे, लोकांना आवडतील असे निर्णय घेणं नाही. मी याच कामासाठी इथे आहे. मला वाटतं की, आजच्या काळात सोशल मीडिया आणि त्यावर होणाऱ्या चर्चांमुळे अनेकदा बाहेरील गोष्टींचा खूप मोठा प्रभाव पडतो.”

तसेच गंभीर पुढे म्हणाला, “लोकांना आवडतील असे निर्णय घेणं खूप सोपं आहे, पण योग्य निर्णय घेणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. यासह ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना पूर्ण विश्वास आणि पाठिंबा मिळेल याची खात्री पटवून देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. संघात खूप टॅलेंटेड खेळाडू आहेत. पण काही असे खेळाडू देखील आहेत, ज्यांनी काही वर्षांपासून चांगली कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी. आम्ही या मालिकेत हाच विचार करून काही निर्णय घेतले आहेत.”

भारतीय संघाने केल्या १९१ धावा

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद १९१ धावा केल्या. यादरम्यान इशान किशनने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने ५० धावांची खेळी केली. शेवटी नमन धीरने ३३ आणि नितीश कुमार रेड्डीने २२ धावा करून संघाची धावसंख्या १९१ धावांवर पोहोचवली.