India vs New Zealand 5th T20I: हॅमिलटनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद १९१ धावा केल्या. १९२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडकडून सेफर्टने दमदार खेळी केली. त्याला ग्लेन फिलिप्सची साथ मिळाली. यासह न्यूझीलंडने हा सामना ७ गडी राखून जिंकला. भारतीय संघाने सामना गमावला, पण ५ सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने विजय मिळवला.
न्यूझीलंडचा दमदार विजय
न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर इशान किशनने चांगला झेल घेतला आणि फिन अॅलेनचा डाव अवघ्या २ धावांवर आटोपला. त्यानंतर सेफर्ट आणि डॅरिल मिचेलने मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान डॅरिल मिचेल २९ धावांवर बाद झाला. शेवटी ग्लेन फिलिप्स आणि सेफर्टने तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान सेफर्टने ९३ आणि फिलिप्सने ६५ धावांची खेळी करून न्यूझीलंडला गडी राखून विजय मिळवून दिला.
भारतीय संघाने केल्या १९१ धावा
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. डावाची सुरूवात करण्यासाठी आलेला अभिषेक शर्मा १ तर संजू सॅमसन अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यरने ९३ धावांची भागीदारी केली. यादरम्यान श्रेयसने ५० तर इशान किशनने सर्वाधिक ६१ धावा केल्या. शेवटी नितीश रेड्डीने २२ आणि नमन धीरने ३३ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ८ गडी बाद १९१ धावांवर पोहोचवली.
भारतीय संघाचा मालिका विजय
भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत दमदार सुरूवात केली होती. मालिकेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयाने सुरूवात केली होती. पण त्यानंतर झालेल्या पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील चौथा सामना भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना गमावला होता. तर पाचवा सामना धावांचा बचाव करताना गमावला आहे.
