भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलसाठी खूप खास आहे. एजाज पटेलचा जन्म मुंबईतच झाला. त्याचे कुटुंब १९९६ मध्ये मुंबईपासून दूर न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते. आता ‘आमची मुंबई’मध्ये एजाज न्यूझीलंडच्या कसोटी जर्सीत दिसणार आहे.

एजाजने आपल्या छोट्या कारकिर्दीत न्यूझीलंडमधील काही संस्मरणीय कामगिरी केली आहे. कानपूर येथील पहिल्या कसोटीत रचिन रवींद्रसोबत एजाजने जवळपास नऊ षटकांची भागीदारी केली, ज्यामुळे पाहुण्या संघाने हा सामना वाचवला होता.

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्क्लेनाघननेही एजाज पटेलबाबत एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये त्याने एक रंजक माहिती दिली आहे. मॅक्क्लेनघन म्हणाला, ”एजाज पटेल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. काही वर्षांपूर्वी, एजाज आपल्या सुट्टीच्या दिवसात गोलंदाजी सुधारण्यासाठी याच मैदानावर मुंबई इंडियन्ससाठी नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. आणि आता न्यूझीलंडकडून कसोटी खेळणार आहे.”

हेही वाचा – IPL 2022 : साथ तुटली..! RCBचा यजुर्वेंद्र चहलला धक्का; संघाला ८ वर्ष दिल्यानंतर म्हणाला, ‘‘सर्व गोष्टींसाठी…”

३३ वर्षीय एजाज पटेलने पाकिस्तानविरुद्ध अबुधाबीमध्ये कसोटी पदार्पण केले. याच सामन्यात पटेलने दुसऱ्या डावात ५ बळी घेत न्यूझीलंडला ४ धावांनी निसटता विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय पटेलने गालेमध्ये श्रीलंकेविरुद्धही ५ बळी घेतले होते. एजाजने मुंबई कसोटी सुरू होण्यापूर्वी सांगितले होते, की न्यूझीलंडचा संघ भारताला कोणत्याही पस्थितीत पराभूत करू शकतो.

आजच्या या सामन्यापूर्वी एजाज भावूक झाला. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाला, ”आम्ही काल जेव्हा मुंबईत आलो, तेव्हा याबद्दल मी विचार करत होतो. येथे आल्याने छान वाटले. यापूर्वी मी कुटुंबासह सुट्ट्यांमध्ये इकडे आलो आहे. पण यावेळी कारण थोडे वेगळे आहे. यावेळी मी क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आलो आहे.”