We have to back him why BCCI is compelled to give chance to Rishabh Pant despite being a flop? VVS Laxman revealed the secret | Loksatta

IND vs NZ: “काही महिन्यांपूर्वीच…” प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मणने ऋषभ पंतला दिला उघड पाठिंबा

ऋषभ पंत सध्या खराब फॉर्ममधून जात असून त्याच्यावर चोही बाजूने टीका होत आहे. संजू सॅमसन अजूनही रांगेत उभा आहे मात्र तरीदेखील प्रशिक्षक लक्ष्मणने पंतला उघड पाठिंबा दिला आहे.

IND vs NZ: “काही महिन्यांपूर्वीच…” प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मणने ऋषभ पंतला दिला उघड पाठिंबा
सौजन्य- (लोकसत्ता ग्राफिक्स)

न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना ख्राईस्टचर्च येथे खेळला गेला. यजमान न्यूझीलंड संघ सामन्यात आघाडीवर असताना पाऊस आल्याने, अखेर सामना रद्द करावा लागला. यासह न्यूझीलंड संघाने ही मालिका १-० अशा फरकाने आपल्या नावे केली. शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर भारताचा न्यूझीलंड दौऱ्यावरील प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणने ऋषभ पंतची पाठराखण केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही कर्णधार शिखर धवनने तिसऱ्या सामन्यासाठीही ऋषभ पंतचा संघात समावेश केला होता. त्यानंतर प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला की संघात त्याला स्थान का दिले जात आहे. त्याचे रहस्य लक्ष्मणने उलगडले आहे.

ऋषभ पंतची खराब कामगिरी असूनही त्याचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वारंवार समावेश केला जात आहे. त्याचवेळी त्याच्या खराब कामगिरीमुळे चाहते चांगलेच संतापले आहेत. विशेषत: जेव्हा संजूसारखा हुशार यष्टिरक्षक फलंदाज त्याच्यामुळे बेंचवर बसतो. पण, आता मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण ऋषभ पंतच्या मदतीला धावून आला आहे.

हेही वाचा :   IND vs NZ 3rd ODI: पावसामुळे मालिकेतील तिसरा सामना रद्द! न्यूझीलंडने १-० ने मालिका घातली खिशात

 प्रशिक्षक लक्ष्मण म्हणाला की, “भारतीय संघ भाग्यवान आहे की आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा समूह आहे. पंतने चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली. दोन सामन्यांपूर्वी त्यांनी ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारताला विजय मिळवून दिला होता. तो मॅचविनर आहे आणि त्याला साथ देणं महत्त्वाचं आहे.” यापूर्वीही टीम इंडियाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पंतला आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाज म्हणून संघात अनेकवेळा संधी दिली आहे.

“हवामानामुळे सामना रद्द होणे हे निराशाजनक आहे, परंतु तरी देखील मिळालेल्या संधीतून बरच काही शिकायला मिळालं. ही प्रशिक्षणाची भूमिका बजावताना मी पूर्णपणे समाधानी आहे, अर्थातच ही केवळ काही काळासाठीची व्यवस्था आहे परंतु तरुणांसोबत काम करताना मजा आली. भारताकडे प्रतिभा आणि बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे,” असे लक्ष्मणने नमूद केले.

हेही वाचा :   PAK vs ENG: अबब…! पाकिस्तानमध्ये पोहचताच इंग्लंड संघातील अनेक खेळाडू पडले आजारी; जाणून घ्या कारण

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज पंत आशिया चषकापासून त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. यानंतरही कर्णधार आणि संघ व्यवस्थापन त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये भरपूर संधी देत ​​आहेत. मात्र, वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील मोठ्या फॉरमॅटमध्ये पंतची कामगिरी नेत्रदीपक राहिली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अलीकडेच त्याने इंग्लंडविरुद्ध पहिले एकदिवसीय शतक झळकावले. त्या सामन्यात त्याने १२५ धावांची धडाकेबाज खेळी केली. पण, जेव्हा टी२० ची वेळ येते तेव्हा त्याची बॅट शांत होते. त्याचबरोबर पंतने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तीन सामन्यांमध्ये केवळ ५० धावा केल्या असून त्यावर आता प्रचंड टीका होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:42 IST
Next Story
सूर्यकुमार यादवला ‘या’ दोन इनिंग आवडतात सर्वात जास्त; त्यातील एक, तर पुन्हा पुन्हा पाहतो