पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आजपासून सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अंधूक प्रकाशामुळे खेळात सातत्याने व्यत्यय आला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६४.४ षटकात ३ गडी गमावत १४६ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सांभाळला आहे.

भारताचा डाव

भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. ६१ धावांवर भारताने आपला पहिला गडी रोहितच्या रुपात गमावला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने रोहितला बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहितने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला. नील वॅग्नरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. या दोघानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळायचा प्रयत्न केला, पण उपाहारानंतर भारताने अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला गमावले.

ट्रेंट बोल्टने पुजाराला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. पुजारानंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे मैदानात आला. विराट आणि अजिंक्यने भारताला शंभरीपार नेले. तिसऱ्या सत्रात काही वेळ अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात.  काही वेळानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दरम्यान विराट आणि अजिंक्यने भारतासाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. काही षटके खेळल्यानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. यानंतर खेळ होणार नसल्याचे पंचानी जाहीर केले. विराट कोहली एका चौकारासह ४४ तर अजिंक्य ४ चौकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला आहे.

 

कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी पावसाने अडथळा आणला. साऊथम्प्टनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्याचा राखीव दिवसही वापरला जाणार आहे. म्हणजे जर हवामान चांगले असेल तर सामना संपूर्ण पाच  दिवसांचा असेल. प्रत्येक दिवशी ९८ षटकांचा खेळ खेळला जाणे अपेक्षित आहे, पण दुसऱ्या दिवसअखेर तसे झाले नाही.

 

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.

दोन्ही संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोमे, काईल जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग.

> कोणत्या वाहिन्यांवर पाहता येणार सामना?

स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्यावरुन या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण केले जात आहे.

> ऑनलाइन कुठे पाहता येईल हा सामना?

डिस्ने हॉटस्टारवर हा सामना लाइव्ह पाहता येईल. सबस्क्रीप्शन असणाऱ्या युझर्सला हा सामना लाइव्ह पाहता येईल.

Live Blog

22:55 (IST)19 Jun 2021
दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या ३ बाद १४६ धावा

अंधूक प्रकाशामुळे पंचानी तिसऱ्या सत्रात खेळ होणार नसल्याचे जाहीर केले. भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६४.४ षटकात ३ गडी गमावत १४६ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सांभाळला आहे.

21:50 (IST)19 Jun 2021
खेळ पुन्हा थांबला

६४.४ षटके खेळल्यानंतर अंधूक प्रकाशामुळे पुन्हा खेळ थांबवण्यात आला. भारताचा कर्णधार विराट कोहली अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. त्याने नाबाद ४४ तर अजिंक्यने नाबाद २९ धावा केल्या आहेत.

21:17 (IST)19 Jun 2021
खेळ पुन्हा सुरू

खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. भारताने ६३ षटकात ३ बाद १४१ धावा केल्या आहेत.

20:47 (IST)19 Jun 2021
अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला

तिसऱ्या सत्रात अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला असून भारताने ५८.४ षटकात ३ बाद १३४ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली ४० तर अजिंक्य रहाणे २२ धावांवर नाबाद आहे.

19:59 (IST)19 Jun 2021
चहापानापर्यंत भारत

चहापानापर्यंत भारताने ५५.३ षटकात ३ बाद १२० धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी ३२ धावांची भागीदारी रचली. विराटने ३५ तर अजिंक्यने १३ धावा केल्या आहेत.

19:26 (IST)19 Jun 2021
टीम इंडियाचं शतक पूर्ण

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी ४७व्या षटकात भारताचे शतक फलकावर लावले. ५२ षटकात भारताने ३ बाद १०७ धावा केल्या आहेत.

18:36 (IST)19 Jun 2021
चेतेश्वर पुजारा स्वस्तात बाद

उपाहारानंतर भारताने अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला गमावले. ट्रेंट बोल्टने पुजाराला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. पुजारानंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे मैदानात आला आहे. भारताच्या ४०.२ षटकात ३ बाद ८८ धावा झाल्या आहेत.

17:06 (IST)19 Jun 2021
पहिले सत्र आणि भारत

उपाहारापर्यंत भारताने २८ षटकात १ बाद ६९ धावा केल्या आहेत. विराट (६) आणि चेतेश्वर पुजारा (०) ही जोडी मैदानावर असून भारताने रोहित शर्माला ३४ तर शुबमन गिलला २८ धावांवर गमावले आहे.

16:56 (IST)19 Jun 2021
भारताला दुसरा धक्का, शुबमन माघारी

रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला. नील वॅग्नरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. शुबमन  बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे. भारताच्या २६.१ षटकात २ बाद ६७ धावा झाल्या आहेत.

16:30 (IST)19 Jun 2021
भारताला पहिला धक्का, हिटमॅन माघारी

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने रोहित शर्माला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहितने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. भारताच्या २०.१ षटकात १ बाद ६२ धावा झाल्या असून चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

16:26 (IST)19 Jun 2021
भारताची आश्वासक सुरुवात

भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी आश्वासक सुरुवात केली. १७व्या षटकात कॉलिन डी ग्रँडहोमेच्या चेंडूवर चौकार ठोकत रोहितने भारताला अर्धशतकी पल्ला गाठून दिला.

15:05 (IST)19 Jun 2021
भारताच्या डावाची सुरुवात

भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांकडून स्विंग गोलंदाजीचे दर्शन घडत आहे.

14:55 (IST)19 Jun 2021
न्यूझीलंडच्या संघात पाच वेगवान गोलंदाज

नाणेफेकीपर्यंत न्यूझीलंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली नव्हती, पण आता त्यांचा संघ समोर आला आहे. प्लेईंग इलेव्हनमध्ये कर्णधार केन विल्यमसनने ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर, काईल जेमीसन, टिम साऊदी आणि कॉलिन डी ग्रँडहोमे या पाच वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे.