IND vs NZ: न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर भारताच्या नावावर खास विक्रम; पाकिस्तानला टाकले मागे

रोहित आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाचाही विजयी प्रारंभ झाला.

IND vs NZ India became the first team to win 50 T20Is while chasing the target
(AP Photo/Altaf Qadri)

नव्या प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारताने बुधवारी न्यूझीलंडवर पाच विकेट्सने मात करत तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमार यादव आणि कर्णधार रोहित शर्मा  या मुंबईकरांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून मात केली. याचप्रमाणे रोहित आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाचाही विजयी प्रारंभ झाला.

न्यूझीलंडने उभे केलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने या सामन्यात टी२० प्रकारातील ५० वा विजय नोंदवला. यासह भारतीय संघाने इतिहास रचला आहे, कारण यापूर्वी कोणताही संघ अशी कामगिरी करू शकला नव्हता. या सामन्यापर्यंत लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान, भारत आणि ऑस्ट्रेलियाने समान ४९ सामने जिंकले होते, मात्र आता भारतीय संघ पुढे गेला आहे.

टी २० फॉरमॅटमध्ये धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत पाकिस्तान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांनंतर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांचा क्रमांक लागतो. त्यांनी अनुक्रमे ४२, ३५ आणि ३२ सामने जिंकले आहेत. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी संघाची सुरुवात खराब झाली. विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा डॅरिल मिशेल खाते न उघडता भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर संघाने १६४ धावा केल्या.

१६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघातर्फे सूर्यकुमार यादव (४० चेंडूंत ६२ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ४८) यांनी दमदार खेळी केली. संघाने पाच गडी गमावून हे लक्ष्य गाठले. या सामन्यात प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन केलेले श्रेयस अय्यर आणि नवोदित व्यंकटेश अय्यर काही विशेष कामगिरी करु शकले नाहीत. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने डॅरिल मिशेलच्या चेंडूवर चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs nz india became the first team to win 50 t20is while chasing the target abn

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या