Mitchell Santner Press Conference IND vs NZ Final: टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ८ मार्चला खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होईल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला मिचेल सँटनरने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान त्याने जसप्रीत बुमराहबाबत केलेलं वक्तव्य सर्वांचं लक्ष वेधत आहे.
२०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी काही लोकांची मन तोडण्यास तो तयार असल्याचं स्पष्ट केलं. न्यूझीलंड संघ दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे आणि आपलं टी-२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावण्यावर त्यांच्या नजरा असतील. पण, काही भारतीय खेळाडूंमुळे संघ नक्कीच टेन्शनमध्ये आहे. त्याने सेमीफायनलमधील जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवरही चर्चा केली.
न्यूझीलंडच्या कर्णधाराने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं. शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना सँटनर म्हणाला, “बुमराहबद्दल बोलायचं तर तो ज्या पद्धतीने खेळत आहे, त्याबद्दल सर्वांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे असं मला वाटतं. माझ्या मते इंग्लंडला हरवणं खरोखर कठीण दिसत होतं. पण तो त्यादिवशी भारतासाठी निश्चितच गेम चेंजर ठरला.”
मिचेल सँटनर टीम इंडियाबाबत नेमकं काय म्हणाला?
सँटनरने स्पष्ट केलं की भारताचा धोका कोणत्याही एका खेळाडूपुरता मर्यादित नाही. तो भारतीय संघाच्या सामूहिक ताकदीबद्दल बोलला. “आम्हाला माहित होतं की हे घडेल. तो अर्थातच एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, परंतु फक्त तोच नाही. मला वाटतं की संघातील प्रत्येक खेळाडूने बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळी चांगली कामगिरी केली आहे आणि संघ म्हणून तुम्हाला तेच हवं आहे,” सँटनर म्हणाला.
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, मोठ्या सामन्याचा दबाव असला तरी त्यांचा संघ आपल्या प्रक्रियेवरच लक्ष केंद्रित ठेवेल. “आम्ही परिस्थिती किंवा प्रतिस्पर्ध्यांमुळे दडपणाखाली येण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही मैदानावर उतरतो आणि आमचा खेळ खेळतो,” असं सँटनरने शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
न्यूझीलंडला या सामन्यात फेव्हरिट मानलं जात नसल्याची जाणीवही सँटनरने व्यक्त केली. मात्र त्याबाबत संघाला काहीच अडचण नसल्याचं तो म्हणाला. “बहुतेक जण आम्हाला फेव्हरिट मानत नाहीत, पण त्याचं आम्हाला काही वाटत नाही. आम्हाला माहfत आहे की छोट्या-छोट्या गोष्टी नीट केल्या आणि संघ म्हणून दमदार कामगिरी केली, तर ट्रॉफी जिंकण्याची संधी आमच्याकडे असेल,” असं तो म्हणाला. “ट्रॉफी उचलण्यासाठी काहींची मनं तुटली तरी चालेल,” असंही सँटनरने मिश्किलपणे सांगितलं.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २०२६ टी-२० विश्वचषक अंतिम सामना रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. किवी संघ त्यांचं पहिलं विजेतेपद जिंकण्याच्या प्रतिक्षेत आहे, तर भारतीय संघ तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून इतिहास घडवण्याचं ध्येय ठेवेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या विश्वचषकात विजय मिळवला होता. सूर्यकुमार यादव आता हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.
