india vs New Zealand 4th T20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ टी-२० सामनांच्या मालिकेतील चौथा सामना विशाखापट्ट्णमच्या वीडीसीए स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात शिवम दुबेच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ७ गडी बाद २१५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून शिवम दुबेने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून तिसरं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. पण भारतीय संघ दिलेलं आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करू शकलेला नाही. भारतीय संघाला हा सामना ५० धावांनी गमवावा लागला आहे. यासह न्यूझीलंडने या मालिकेत ३-१ ने पुनरागमन केलं आहे.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण सलामीला आलेला अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव देखील अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. मालिकेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेला संजू सॅमसन या सामन्यातही फ्लॉप ठरला.
संजूने अवघ्या २४ धावा केल्या. रिंकू सिंगला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. रिंकूने ३९ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या अवघ्या २ धावा करत माघारी परतला. शिवम दुबेने २३ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. पण तो धावबाद होऊन माघारी परतला. हर्षित राणाने ९ धावा केल्या. तर अर्शदीप सिंग शून्यावर माघारी परतला. भारतीय संघाला हा सामना ५० धावांनी गमवावा लागला आहे.
न्यूझीलंडने केल्या २१५ धावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला चांगली सुरूवात मिळाली. सलामीला आलेल्या डेव्हॉन कॉन्वे आणि टीम सेफर्ट यांनी मिळून १०० धावांची सलामी दिली. डेव्हॉन कॉन्वेने २३ चेंडूंचा सामना करत ४४ धावांची खेळी केली. तर टीम सेफर्टने ३६ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची खेळी केली. रचिन रवींद्र अवघ्या २ धावा करत माघारी परतला. ग्लेन फिलिप्सने २४ धावा केल्या. शेवटी डॅरिल मिशेलने नाबाद ३९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकांअखेर ७ गडी बाद २१५ धावा केल्या.
