India vs New Zealand ODI Series Changes in Indian Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. कर्णधार शुबमन गिल संघाचं नेतृत्त्व करताना दिसेल. तर श्रेयस उपकर्णधार आहे. दरम्यान २०२६ मध्ये रोहित-विराट पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे. पण या मालिकेला सुरू होण्याच्या काही तास आधीच संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
पहिला वनडे सामना कोटांबी स्टेडियम वडोदरा येथे होत आहे. वडोदरामध्ये पहिल्यांदाच पुरूषांचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सामन्यापूर्वी खेळाडूंची सरावासाठी जाताना झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. या सरावादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली. त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला असून त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
ऋषभ पंतला नेमकी कशी झाली दुखापत? पाहा VIDEO
शनिवारी वडोदरा क्रिकेट स्टेडियमवर नेट प्रॅक्टिस दरम्यान थ्रोडाऊन स्पेशालिस्टचा चेंडू पंतच्या कुशीत लागला. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. मैदानावर सपोर्ट स्टाफकडून तपासणी केल्यानंतर पंत मैदानाबाहेर गेला. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने ऋषभ पंतबाबत जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, उजव्या पोटाच्या खालच्या भागात वेदना जाणवू लागल्याने त्याला एमआरआय स्कॅनसाठी नेण्यात आले. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याच्या क्लिनिकल आणि रेडिओलॉजिकल रिपोर्ट्सबाबत तज्ज्ञांशी चर्चा केली. पंतला साईड स्ट्रेन झाल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला ऋषभ पंतच्या जागी संघात स्थान देण्यात आलं आहे. ध्रुव जुरेलने सात सामन्यांमध्ये ९३ च्या सरासरीने ५५८ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकं आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७ सामन्यांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप तीन खेळाडूंमध्ये ध्रुव जुरेलचा समावेश आहे.
