रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडला ५ गड्यांनी मात दिली. भारताचा नवा आणि पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचाही हा पहिला विजय ठरला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कप्तान म्हणून रोहितने भारताला उत्तम सुरुवात मिळवून दिली. अर्धशतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. बोल्टने त्याला ४८ धावांवर रचिन रवींद्रकरवी झेलबाद केले.

सामन्यानंतर रोहितने आपल्या हुकलेल्या अर्धशतकावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने बोल्टबाबतही मत दिले. तो म्हणाला, ”आम्ही मुंबई इंडियन्ससाठी खूप क्रिकेट खेळलो आहोत. बोल्टला माझ्या कमकुवत बाजू माहीत आहेत आणि मला त्याची ताकद माहीत आहे, दोघांमध्ये चांगली लढत झाली. जेव्हा मी त्याचा कॅप्टन असतो, तेव्हा मी त्याला नेहमी ‘ब्लफ’ करायला सांगतो आणि त्याने तेच केले. त्याने मिड-विकेटचा खेळाडू मागे ठेवला आणि फाइन लेग वर ठेवला आणि मला माहीत होते की तो बाउन्सर टाकणार आहे. मी चेंडू क्षेत्ररक्षकावरून मारण्याचा प्रयत्न करत होतो, पण दुर्दैवाने चेंडूला जास्त वेग नव्हता.”

सामन्याबाबत रोहित म्हणाला, ”हा विजय सोपा नव्हता, युवा खेळाडूंना खूप शिकण्यासारखे होते कारण त्यांनी भारतासाठी यापूर्वी अशा परिस्थितीत फलंदाजी केलेली नव्हती. काय करावे लागेल हे समजून घेणे त्यांच्यासाठी खूप चांगले शिक्षण होते. एक संघ म्हणून आम्ही आनंदी आहोत की त्यांनी अशा परिस्थितीत फलंदाजी केली आणि सामना संपवला. तांत्रिकदृष्ट्या एक चांगला खेळ होता, काही खेळाडूंची उणीव होती आणि नवीन खेळाडूंकडे क्षमतेनुसार काय आहे ते पाहता आले. आमच्या सर्व गोलंदाजांनी खूप प्रयत्न केले. अश्विन आणि अक्षर दिल्ली कॅपिटल्ससाठी एकत्रितपणे गोलंदाजी करतात आणि ते नेहमी विकेट घेण्याचा विचार करतात. सूर्याने शानदार फलंदाजी केली.”

हेही वाचा – भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने? रमीझ राजांचे संकेत; म्हणाले, ‘‘तिरंगी मालिकेसाठी…”

असा रंगला सामना…

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.