Sanju Samson Abhishek Sharma World Record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ अंतिम सामना खेळवला जात आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असून या सामन्याची नाणेफेक न्यूझीलंडने जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि टीम इंडियाच्या सलामीवीरांनी विक्रमी धावसंख्या उभारली. आजवर कोणीही न केलेला अनोखा धावांचा विक्रम भारताने आपल्या नावे केला आहे.

भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने इतिहास घडवला आहे. भारताने नाणेफेक गमावली असली तरी संघाला प्रथम फलंदाजी करायची होती. टीम इंडियाचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. संजू सॅमसन व अभिषेक शर्माच्या जोडीने २४ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. टी-२० विश्वचषक फायनलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा पराक्रम करण्यात आला. यापूर्वी, २००७ ते २०२४ पर्यंत, कोणत्याही सलामी जोडीने अंतिम सामन्यात पन्नासपेक्षा जास्त सलामीची भागीदारी केली नव्हती. याशिवाय अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड संघाने आपल्या नावे केला.

भारताने टी-२० विश्वचषक फायनलमध्ये पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये बिनबाद ९२ धावा कुटल्या आणि संघाला वादळी सुरूवात करून दिली. याआधी वेस्ट इंडिजने २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरूद्ध ९२ धावा केल्या होत्या. पण तेव्हा संघाने १ विकेट गमावली होती.

संजू-अभिषेकने पाकिस्तानच्या जोडीचा रेकॉर्ड मोडला

कोणत्याही संघाच्या सलामी जोडीने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कधीही पन्नासपेक्षा जास्त धावांची भागीदारी केलेली नाही. २००९ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचे सलामीवीर कामरान अकमल आणि शाहझैब हसन यांनी ४८ धावांची भागीदारी केली होती. या पाकिस्तानी सलामी जोडीचा आता १७ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. ९८ धावा ही टी-२० विश्वचषक फायनलमध्ये कोणत्याही सलामी जोडीने केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली.

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच १०० धावांची भागीदारी होऊ शकली असती, पण अभिषेक बाद झाल्याने ही संधी हुकली. गेल्या १९ वर्षांत असं कधीच घडले नव्हतं. संजू आणि अभिषेक यांनी २४ चेंडूत ५० धावा केल्या आणि नंतर ४३ चेंडूत ही भागीदारी ९८ धावांवर नेली. रचिन रवींद्र आठव्या षटकात अभिषेकला बाद केल्याने ही भागीदारी तुटली.

संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी सलामीवीर म्हणून अभिषेक शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय होता, परंतु अंतिम सामन्यात त्याने २१ चेंडूत ५२ धावा करत चमकदार कामगिरी केली आणि संघाला चांगली सुरूवात करून दिली. याशिवाय संजू सॅमसननेही सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. पण संजूचं शतक मात्र पुन्हा एकदा हुकलं. संजू ४६ चेंडूत ५ चौकार व ८ षटाकारंसह ८९ धावा करत बाद झाला.

टी२० विश्वचषकात सर्वात मोठी पॉवरप्लेमधील धावसंख्या

९२/० – भारत विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, २०२६ अंतिम सामना
९२/१ – वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान, ब्रिजटाऊन, २०२४
९१/१ – नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड, सिल्हेट, २०१४
८९/३ – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुंबई वेस्ट इंडिज, २०१६
८६/१ – भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली, २०२६